ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची सोमवारी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शाळा’ घेतली. मागील टर्ममध्ये ज्या पद्धतीने काहींनी आपल्याच पक्षातील काहींचे पाय खेचण्याचे प्रयत्न केले, तसे न करता एकदिलाने काम करण्याचा संदेश त्यांनी सर्व नगरसेवकांना दिला. तसेच ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले आहे, त्यांचा विश्वास सार्थकी ठरवण्याची ही वेळ असून ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करण्याचे आदेशही दिले.ठाणे महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला तब्बल २५ वर्षांनंतर स्पष्ट बहुमत मिळाले असून त्यांचे ६७ नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु, २०१२ मध्ये जो अध्याय सर्वपक्षीय नगरसेवकांकडून लिहिला गेला, तो पुन्हा लिहिला जाऊ नये, यासाठी ही बैठक खूप महत्त्वाची होती. या बैठकीत नेमकी त्याच विषयाला अनुसरून चर्चा झाली. या वेळी शिंदे यांच्यासमवेत खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, रवींद्र फाटक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सत्तेत आपण असतानाही आपल्याच काही मंडळींकडून वारंवार आपल्या पक्षातील काही मंडळींना टार्गेट केल्याचे दिसून आले होते. तसे आता होऊ नये, अशी ताकीदही त्यांनी दिली. ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण निवडून आलो आहोत, त्यांच्यासाठी आता काम करा, त्यांच्या संपर्कात जा, यापुढे प्रभागात कोणत्याही स्वरूपाचे कार्यक्रम घेणार असाल, तर प्रथम त्यांना विश्वासात घ्या, त्यांना व्यासपीठावर बसवा. असे न केल्यास त्या कार्यक्रमाला कोणताही आमदार अथवा खासदार उपस्थित राहणार नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. असे सांगतानाच त्यांनी या माध्यमातून निष्ठावंतांनादेखील आपलेसे करण्याचा सूचक इशाराच या बैठकीतून दिला. (प्रतिनिधी)>एकत्रितपणे आणि सहकार्याने काम करासभागृहात कसे वावरायचे, सत्ताधारी असल्याने केवळ विरोधाला विरोध न करता एकत्रितपणे सर्वच नगरसेवकांनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिकाही सभागृहात घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, जे नवीन नगरसेवक असतील, त्यांनी वरिष्ठांची चर्चा करूनच सभागृहातील कामकाज समजूून घ्यावे, असेही शिंदे यांनी या वेळी सांगितले.
पक्षशिस्तीबाबत घेतली शाळा
By admin | Published: February 28, 2017 3:11 AM