जान्हवी मोर्ये/ लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसरातील शालेय वाहतूक करणाऱ्या बस चालकांच्या विरोधात शाळा सुरु होण्यापूर्वीच कल्याण आरटीओ कार्यालयाकडून कारवाई सुरु होणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही कारवाई अधिक गतीमान होणार आहे. मे महिन्यात आरटीओने शालेय वाहतूक करणाऱ्या १५ बसेसची तपासणी केली, त्यात दोन बसेस दोषी आढळल्या आहेत. त्यापैकी एक बस जप्त करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आणि कल्याण आरटीओ परिसरात इंग्रजी माध्यमाच्या तसेच इतर भाषिक शाळा आहे. त्यात बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळांना खाजगी बसेस आहेत. त्यातून विद्यार्थ्याची वाहतूक होते. शाळेचे अंतर कमी असले तरी सर्व विद्यार्थ्यांना घेत बस जात असल्याने अंतर कमी आणि फेरा जास्त असा मामला पहावयास मिळतो. ज्या शाळा विद्यार्थ्यांच्या घरापासून दूर आहेत. त्यांच्यासाठी बस सेवा, रिक्षा, व्हॅन सोयीची पडते. बस व्यतिरिक्त रिक्षा व व्हॅन ही विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. मात्र, त्यांच्याकडून नियमावलीचे पालन होत नाही. बहुतांश रिक्षा आणि व्हॅनमध्ये विद्यार्थी कोंबून भरले जातात. शालेय बसकरिता मोटार वाहन कायदा २०१० अस्तित्वात आला. त्यात वैध परवाना, त्यावर शालेय बस लिहिलेले, खिडक्याला लोखंडी ग्रील आणि महिला सहाय्यक आदी असणे आवश्यक आहे. अनेक बसेसमध्ये या गोष्टी आढळत नाहीत. बसमालक, मुख्याध्यापक, पालक आणि आरटीओ यांची एक समिती स्थापन केले जाणे अपेक्षित होेते. अशी समिती स्थापन नसून, केवळ हा नियम कागदावर असल्याचे दिसते. त्रूटी असलेल्या आणि नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरटीओ कार्यालयाकडून केवळ दंड आकारला जातो. मात्र, दंड आकारून सोडून दिलेली शालेय वाहतूक करणारी वाहने ज्या त्रुटींसाठी दंड भरतात, त्याची पूर्तता करतात की नाही हे पाहिले जात नाही. त्यामुळे दंड भरला की पुन्हा नियम तोडण्यास मोकळे अशी मानसिकता शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये दिसून येते. विद्यार्थ्यांची जीवित सुरक्षितता जोपासली जावी आणि लैगिंक शोषण रोखले जावे यासाठी बसमध्ये सीसीटीव्हीही लावले जावेत असा दंडक असून, त्याची पूर्ततादेखील अनेक शाळा करीत नाहीत. सीसीटीव्ही असला तरी त्याचे चित्रीकरण दर आठवड्याला अथवा दिवसाला तपासले जात नाही. एखादा अनुचित प्रकार घडल्यावर मगच चित्रीकरण तपासले जाते. या कारणांमुळेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही तपासणी मोहीम सुरू होणार आहे.कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध शाळेतील मुलांची वाहतूक करणाऱ्यासाठी जवळपास पाच हजार खाजगी वाहने आहेत. त्यापैकी शालेय वाहतूक करणाऱ्या बसेसची संख्या तीन हजार इतकी आहे. शालेय वाहतूक करणाऱ्या बसेस, रिक्षा, व्हॅन यांच्याकडून नियमावलीचे उल्लंघन झाल्यास त्यांची तपासणी केली जाते. त्यांच्यावर कारवाई होते. अपुऱ्या स्टाफमुळे तपासणी मोहीम फार प्रभावी नाहीवर्षभरात आरटीओ कार्यालयाने शालेय वाहतूक करणारी ५९८ वाहने तपासली आहेत. त्यापैकी ९६ वाहने दोषी आढळून आली. दोषी वाहनांपैकी १३ वाहने जप्त केली आहेत. त्यात शालेय वाहतूक करणाऱ्या बसेसची संख्या जास्त आहे. दोषी आढळलेल्या वाहन मालकांकडून ६ लाख १५ हजार १४० रुपये इतका दंड आकारला आहे. आरटीओ कार्यालयाकडून वर्षभरात ही तपासणी मोहिम राबविली गेली. आरटीओ कार्यालयाकडे अपुरा स्टाफ असल्याने कारवाई व तपासणी मोहिम प्रभावीपणे करता येत नसल्याचे आरटीओ कार्यालयाचे म्हणणे असले तरी केलेली कारवाई ही समाधानकारक असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.
शालेय वाहतूक सेवा अजूनही सदोषच
By admin | Published: June 03, 2017 6:14 AM