पंकज रोडेकर, ठाणेमिसाइल मॅन तथा देशाचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी १५ आॅक्टोबर रोजी राज्य शासनाने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेत ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत कलाम यांचे बालपण, देशसेवा आदींचे वाचन क रून मुलांना वाचनाचे महत्त्व कळावे, एवढा उद्देश आहे. त्यामुळे १५ आॅक्टोबरला दप्तराविना शाळा भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत पुण्यातील प्राथमिक शिक्षण संचालनालय विभागाने जिल्ह्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.माजी राष्ट्रपती कलाम यांच्यासारखा महान देशभक्त आणि त्यांची देशसेवा लक्षात घेऊन त्यांच्या जन्मदिनीच त्यांची जीवनगाथा भावी पिढीला मार्गदर्शक ठरू शक ते, म्हणून ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा करण्याची संकल्पना राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आखली आहे. हा दिवस साजरा करण्याची तयारी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सुरू केली आहे. हा उपक्रम तिसरी ते आठवी इयत्तांसाठी असून, यामध्ये निबंध स्पर्धेसाठी कलाम यांचे बालपण, तसेच महान शास्त्रज्ञ, वक्तृत्व स्पर्धेसाठी कलाम व मुले, त्यांची देशसेवा, प्रश्नमंजुषेत त्यांचे जीवनकार्य, अखंड वाचनात सलग एक तास अखंड वाचन, निवडक कविता, व्याख्यानात काय-कसे वाचावे आणि त्याचे महत्त्व त्याचबरोबर पथनाट्यांमध्ये त्यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम असावा, तसेच या दिवशी पुस्तकांचे प्रदर्शनही आयोजित करावे, असे आराखड्यात म्हटले आहे.
१५ आॅक्टोबरला दप्तराविना शाळा
By admin | Published: October 12, 2015 5:17 AM