ठाणे : कोविड-१९ महामारीचे शिक्षण क्षेत्रावर गंभीर परिणाम झाले आहेत. यावर मात करण्यासाठी मुरबाड तालुक्यात गावपाड्यांमधील सुशिक्षित तरुणांना एकत्र करून त्यांच्या मदतीने भेरेवाडी, वाघवाडी, दिवाणपाडा, मोहवाडी, केव्हारवाडी आणि शिरवाडी या सहा आदिवासी गावपाड्यांमध्ये शालेय वर्ग सुरू करून विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. कोविड-१९ शाळा उपक्रमाला गावातील शेकडो विद्यार्थी व पालकांनी प्रतिसाद दिला आहे.
श्रमिक मुक्ती संघटना व वननिकेतन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या कोविड-१९ शाळा सुरू करून शिक्षण जिवंत ठेवण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. आगामी १० दिवसांत मुरबाड, शहापूर तालुक्यांत तब्बल ३० गावपाड्यांमध्ये हा उपक्रम सुरू करण्याचा मानस या संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अॅड. इंदवी तुळपुळे यांनी व्यक्त केला आहे.
सध्या या सहा शाळा मुरबाडच्या आदिवासी गावपाड्यांमध्ये सुरू केल्या आहेत. त्यास पालकांनी पाठिंबा दिला असून शेकडो विद्यार्थी या शाळांमध्ये शालेय धडे गावातील सुशिक्षित बेरोजगार युवायुवतींकडून घेत असल्याचा दावा त्यांनी केला. यासाठी त्यांनी आधी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, ठाणे जिल्हाधिकारी आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या सीईओंना या उपक्रमाची कल्पना देऊन या शाळा सुरू केलेल्या आहेत.
दोन कोटी विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन शिक्षण यंत्रणा उभी करणे अशक्य
गेले पाच महिने शालेय शिक्षण संपूर्ण थांबलेले आहे. लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी व शिक्षक शाळेपर्यंत पोहोचणे व निकट सान्निध्यात शिकवण्याचे काम करणे अशक्य झालेले आहे. जे सर्वदूर पोहोचू शकते ती म्हणजे पाठ्यपुस्तके.
बालभारतीने चोखपणे पाठ्यपुस्तके छपाईचे काम केले व ही पुस्तके शिक्षण विभागाने बहुसंख्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली ही आनंदाची व अभिनंदनाची बाब आहे. परंतु, आता प्रश्न आहे, तो म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणार कोण व कसे? याला आॅनलाइन शिक्षण हे मात्र उत्तर नाही.
आॅनलाइन शिक्षण हे शब्द व संकल्पना आकर्षक असल्या तरी त्यांच्या परिणामकारकतेचा, व्यवहार्यतेचा व धोक्याचा सांगोपांग विचार केला, तर असेच दिसते की, सरकारी व खाजगी शाळा मिळून सुमारे दोन कोटी विद्यार्थी संस्थेला आणि शहरी, ग्रामीण, डोंगरी, गरीब- वंचित, कष्टकरी आदी गटांना सामावून घेणारी आॅनलाइन शिक्षण यंत्रणा उभी करणे आजघडीला अशक्य गोष्ट आहे, असे संघटनेने शासन व प्रशासनाच्या निदर्शनात आणून देत या कोविड-१९ शाळा या महामारीच्या संचारबंदीत सुरू केल्या आहेत.
केवळ तंत्रज्ञानाचा विचार केला तर विजेची उपलब्धता, नेटक्षमता, इंटरनेट- स्मार्ट फोनची सुविधा यासारख्या पूर्वअटींची पूर्तता नियमित होईल, अशी परिस्थिती आज बहुसंख्य ग्रामीणच काय शहरी भागांतही नाही. त्यामुळे येथील विद्यार्थीवर्ग आॅनलाइन शिक्षण प्रक्रियेतून वगळला जाऊन शिक्षण क्षेत्रातील विषमता आणखीनच वाढेल. येथील विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची, न्यूनगंडाची भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिथे पालकांची सुजाण देखरेख नाही, अशा ठिकाणी जरी तंत्रज्ञान उपलब्ध झाले तरी मोबाइलच्या अनिर्बंध, दीर्घ वापरामुळे त्याच्या किरणांचा डोळ्यांवर व मेंदूवर परिणाम होऊन नवीनच आरोग्यसमस्या निर्माण होऊ शकतात आदी संकटांची जाणीवही करून देण्यात आली आहे.