अंबरनाथ : अंबरनाथमधील नगरपालिका शाळांच्या दुरुस्तीच्या निविदा या २१ टक्के कमी दराच्या असल्याने दुरूस्तीत अनियमितता निर्माण होण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते. या वृत्तामुळे सभागृहात शाळा दुरूस्तीचा विषय चांगलाच गाजला. यावर मुख्याधिकाऱ्यांनी कामामध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. तसे केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. संबंधित कंत्राटदाराकडून काम पूर्ण करण्याची हमी घेतली जाईल. काम पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कठोर कारवाईचे संकेतही मुख्याधिकाऱ्यांनी दिले. कमी किमतीत शाळांची दुरूस्ती शक्य नाही असे मत नगरसेवक प्रदीप पाटील, वृषाली पाटील आणि उमर इंजिनिअर यांनी व्यक्त केले. यावर उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनीही शाळा दुरूस्तीचे काम करताना रेती ऐवजी ग्रीड पावडरचा वापर होण्याची शक्यता वर्तवत हे काम निकृष्ट होण्याची भीती व्यक्त केली. याच मुद्दयावर भाजपा नगरसेवक तुळशीराम चौधरी आणि भरत फुलोरे यांनीही शाळेच्या कामात हलगर्जीपणा नको अशी मागणी केली. सभागृहातील नगरसेवकांच्या तक्रारी लक्षात घेता आणि शाळेबाबत नगरसेवकांच्या भावनांचा विचार करून या कामामध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असे स्पष्टीकरण मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी सभागृहात दिले. या आधी काय झाले यावर चर्चा न करता यापुढे निकृष्ट काम झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर सर्वात आधी कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. प्रत्येक कामाची मोजणी केली जाईल आणि त्याचा रेकार्ड तयार केल्यावरच बिले दिली जातील. शाळेचे छप्पर आणि वर्ग खोलीतील फ्लोरींगच्या कामांवर अधिकाऱ्यांना देखरेख ठेवण्याचे आदेश दिले. संरक्षण भिंत उभारताना कामाचा दर्जा तपासला जाईल असे मुख्याधिकारी म्हणाले. (प्रतिनिधी) खड्यांचे कामही निकृष्टदरम्यान, शाळेच्या विषयासोबत खड्डे भरण्याच्या विषयावरही नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. खड्डे भरण्याचे काम हे निकृष्ट होत असून त्या कामाची पाहणी केली जात नाही असा आरोप नगरसेवकांनी केला. खड्डे भरण्याच्या नावावर रस्ते तयार करून घेण्याचे काम केले जात असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले. अनेक प्रभागात खड्डे भरलेच गेले नाही असा आरोप केला. नगरसेविका रोहिणी भोईर, अनिता भोईर, अपर्णा भोईर, प्रदीप पाटील, उमर इंजिनिअर, शशांक गायकवाड, संदीप भराडे आणि सुरेंद्र यादव यांनीही खड्डे भरण्याच्या कामावरून प्रशासनावर आरोप केले.
सर्वसाधारण सभेत शाळेची दुरूस्ती गाजली
By admin | Published: May 01, 2017 6:05 AM