कल्याण - ठाणे जिल्ह्यातील शाळांना देय असलेली ११ वी ऑनलाईन प्रक्रियेतील शुल्काची रक्कम अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्या नंतर आता तातडीने देण्याची कार्यवाही ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने सुरू केली असून येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील सुमारे ४०० शाळांना त्यांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा मेहनताना मिळणार आहे.
अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबईतील उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालयांतर्गत सर्व शाळांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा लाखो रुपयांचा मेहनताना मिळाला. परंतु ठाणे जिल्ह्यातील शाळांना परताव्याची रक्कम मिळत नव्हती. याबाबत अनेक शाळांनी अनिल बोरनारे यांच्याकडे तक्रार केली. बोरनारे यांनी लागलीच मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक व ठाणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांना तातडीने शाळांना रक्कम न मिळाल्यास पुढील वर्षी ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घातला जाईल असा इशारा दिला. त्यानंतर प्रशासनाने हालचाल करून १६ तारखेपर्यंत शाळांकडून माहिती बोलावली असून त्यानंतर लगेच शाळांना त्यांचा परतावा दिला जाणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. मुंबई विभागात दरवर्षी ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येते त्यासाठी विद्यार्थ्यांकडून नोंदणीसाठी शुल्क आकारण्यात येते. हे शुल्क आकारण्याची जबाबदारी शाळांकडे असते. शाळा एकत्रित रक्कम ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने काढलेल्या बँकेच्या खात्यात जमा करते. शाळा प्रत्येक विद्यार्थ्यांचे रेजिष्ट्रेशन व ऑप्शन फॉर्म भरून घेतात यासाठी शाळेला स्वतःचा स्टाफ वापरावा लागतो एका विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून घेण्यासाठी साधारणपणे १५ मिनिटे लागतात विद्यार्थी संख्या पाहता यात शाळांचा खूप वेळ जातो. यासाठी शाळेला नेट चार्ज, प्रिंटर्स, मदतनीस टेक्निशियन व स्टेशनरी साठी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे काही हिस्सा दिला जातो. परंतु वर्ष उलटले तरी रक्कम शाळांना वितरित केली नाहीदरवर्षी मुंबई महानगरक्षेत्रात १० वी उत्तीर्ण होऊन हजारो विद्यार्थी ११ वी साठी ऑनलाईन प्रवेश घेतात त्यांची एकत्रित रक्कम लाखो रुपये होते त्यातील शाळांचा मेहनताना म्हणून प्रती विद्यार्थी रक्कम प्रवेश प्रक्रिया संपल्यावर मिळणे अपेक्षित असतांनाही वर्ष उलटून गेल्यावर शाळांना रक्कम वितरित झालेली नव्हती. याबाबत कल्याण-डोंबिवली तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनीही पाठपुरावा केला होता. आता तातडीने कार्यवाही सुरू केल्याने ऑनलाईन प्रक्रियेवरील बहिष्कार मागे घेत असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
सुट्टी असूनही कार्यालय सुरू
शाळांना त्यांचा ऑनलाईन कामाचा मेहनताना तातडीने मिळावा यासाठी काल शनिवार व आज रविवारची सुट्टी असूनही शाळांकडून माहिती गोळा करण्याचे काम अधिकाऱ्यांनी सुरू ठेवले असून अनिल बोरनारे यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.