ठाणे: विज्ञान काल्पनिक कथा त्या बहुतेक वेळा खूप बटबटीत पद्धतीने आणि बहुतेक वेळा असत्य वाटणारे अथवा असे कधीच होऊ शकणार नाही असे वाटणारे या स्वरुपात मांडलेले असतात. सतत आश्चर्यकारक आणि धक्कादायक गोष्टी घडवत कथा पुढे जात असतात. त्यात गूढ कमी आणि धक्के जास्त अशा घटनांच्या प्रवाहात आपण जात असतो. यात बहुधा अंतराळ आणि परग्रहावरील जीव यांचा जास्त समावेश असतो. त्यामुळे अशा कथा आपल्या डोक्यात जाण्यासाठी चित्रपट माध्यमाची गरज भासते असे मत सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
अनघा प्रकाशन आयोजित आणि पत्रकार दिनार पाठक लिखित 'व्हायरस' या कादंबरीचा प्रकाशन सोहळा स्व.दादा कोंडके प्रेक्षागृह येथे पार पडला. यावेळी डॉ. महाजन बोलत होते. ते म्हणाले, विज्ञान कथा आणि त्यातही काल्पनिक विज्ञान कथा ही एक अत्यंत रोचक जनर आहे आणि मराठीतील अस्सल वाचकांसमोर त्याच्या विस्तारात एक नवीन आणि निरीक्षणात्मक दिशेने विकसीत होत आहे. काल्पनिक विज्ञान कथांचा विज्ञानाच्या समावेशनाव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा पैलू असतो. तो म्हणजे वाचकांच्या मनात गूढ निर्माण करणे आणि अलिखित घटनांबद्दल वाचकास विचार करण्यास भाग पाडणे आणि नकळत वाचक लेखकाच्या कथा प्रवाहात पोहू लागतो आणि गोष्टींचा विचार करु लागतो. हे जेव्हा साध्य होते तेव्हा वाचक ती कादंबरी पुर्ण वाचून होईपर्यंत खाली ठेवत नाही. वाचून झाल्यानंतरही विविध दैनंदिन आणि गत घटनांशी संबंध जोडू लागतो. भाजपाचे अध्यक्ष, आ. ॲड. आशिष शेलार यांनी व्हायरस नावाने पुस्तक निघाले याचा आनंद आणि अप्रुप वाटत असल्याचे सांगितले. सुप्रसिध्द अभिनेते संदीप कुलकर्णी म्हणाले की, एखादा सिनेमा निवडताना स्क्रिप्ट महत्त्वाची असते कारण त्यावर सिनेमा उभा राहतो. या पुस्तकातील लेखन मराठीत कमी लिहीले आहे असे कौतुकोद्गार काढले. यावेळी प्रकाशक अमोल नाले, या पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटणारे प्रदीप म्हापसेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय रानडे यांनी केले. ऋतुजा पाठक यांनी आभार प्रदर्शन केले.