ठाणे : ठाणे शहरात एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मानस ठाणे महापालिकेने व्यक्त केला आहे. आता त्यासाठी महापालिकेच्या १३१ नगरसेवकांकडून प्रत्येकी पाच लाखांचा निधी मागविला जात आहे. परंतु हा निधी देण्यास भाजपच्या काही नगरसेवकांनी विरोध केला आहे. नगरसेवकांचा निधी हा तुटपुंजा पडू शकतो, त्यापेक्षा आपला दवाखान्याचा १५० कोटींचा निधी त्यासाठी वापरण्यात यावा असा सुर भाजपच्या नगरसेवकांनी लावला आहे. त्यामुळे हॉस्पीटल उभे राहणार की नाही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, शहरात आता ग्लोबल इन्पॅक्ट हबच्या ठिकाणी एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मानस पालिकेने व्यक्त केला आहे. या संदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन हे रुग्णालय लवकरात लवकर उभारावे अशा सुचना दिल्या आहेत. त्यानुसार आता हे रुग्णालय उभारण्यासाठी ठाणे महापालिकेने नगरसेवकांच्या खिखाला कात्री देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नगरसेवक निधीतून प्रत्येकी पाच पाच लाख या कामासाठी देण्यात यावेत अशी सुचना पालिकेने केली आहे. त्या अनुषगांने प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी आपल्या नगरसेवकांशी चर्चा करुन हा निधी देण्याच्या सुचना केल्या आहेत. दरम्यान दुसरीकडे भाजपच्या गरसेवकांच्या या चर्चेत अनेक नगरसेवकांनी हा निधी देण्यास विरोध केला असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालय उभारण्यास आमचा विरोध नाही, किंवा निधी देण्यासही आमचा विरोध नाही. मात्र नगरसेवक निधीतून केवळ ६ ते ६.५ कोटी जमा होऊ शकतात. उर्वरीत निधीचे काय करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे या संदर्भात भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी पालिका आयुक्तांना पत्र देऊन नगरसेवक निधी पेक्षा आपला दवाखान्यासाठी जो १५० कोटींच्या आसपास निधी ठेवण्यात आला आहे, तोच निधी या रुग्णालयासाठी देण्यात यावा अशी सुचना त्यांनी केली आहे. तसेही शहरात आपला दवाखाना काही सुरु झालेले नाहीत. शिवाय जे सुरु आहेत, त्याठिकाणी साहित्य, डॉक्टरांची वाणवा आहे. त्यामुळे हा निधी वाया जाण्यापेक्षा तो या रुग्णालयासाठी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता कोरोनाचे हे रुग्णालय ठाण्यात उभे राहणार की नाही? याबाबत मात्र शंका निर्माण झाली आहे.
कोरोना रुग्णालयासाठी नगरसेवकांच्या खिशाला बसणार कात्री, नगरसेवक निधीतून प्रत्येकी पाच लाख देण्याची पालिकेची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 6:10 PM