सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेने भंगारात निघालेल्या १० वाहने निकाली काढण्याचा निर्णय घेऊन, आरटीओ कडून वाहनाचे व्हॅल्यूवेशन काढल्याची माहिती वाहन विभाग प्रमुख विनोद केणी यांनी दिली. गेल्या महिन्यात ई-कचऱ्याच्या नावाखाली ११९ कॉम्पुटर भंगारात काढल्यावरून वाद झाला होता.
उल्हासनगर महापालिकेच्या प्रांगणात १५ वर्ष जुने विविध १० वाहने वर्षानुवर्षे भंगारात धूळखात पडले आहेत. भविष्यात भंगार वाहणापासून दुर्घटना घडू नये म्हणून ते निकाली काढण्याची मागणी होत होती. अखेर वाहन विभागाने भंगारात गेलेल्या वाहनांचे मूल्य निश्चित करण्यासाठी आरटीओकडे पाठपुरावा केला. १० पैकी ७ वाहनाचे व्हॅल्यूवेशन आरटीओने काढले आहे. तर ३ वाहनांची व्हॅल्यूवेशन बाकी असल्याची माहिती वाहन व्यवस्थापक केणी यांनी दिली असून लवकरच भंगार वाहने नियमानुसार निकाली काढण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
महापालिका वाहन विभागाच्या ताफ्यात एकून ७० वाहने असून त्यापैकी १० वाहने भंगारात काढलीं आहे. महापालिका अधिकाऱ्यांना लागणारे वाहनासह इतर वाहने भाडेतत्वावर घेतल्याने, महापालिकेकडे वाहनांची संख्या कमी आहे. महापालिका प्रांगणातील उभी असलेली भंगार वाहने निकाली निघाल्यास त्याजागी इतर वाहने उभे करण्यास जागा उपलब्ध होणार आहे. गेल्या महिन्यात महापालिकेने मुख्यालयातील कागदपत्रांची रद्दी, जुने कपाटे, खुर्च्या भंगारात काढल्या आहेत. तसेच ई-कचऱ्यांचा नावाखाली ११९ कॉम्पुटर भंगारात काढली. एकही दिवस वापरले नसलेल्या प्रिंटर व इतर साहित्य ई-कचऱ्यात दिल्याने, आरोप प्रत्यारोपाने खळबळ उडाली होती. त्यानंतर आयुक्त अजीज शेख यांनी विभागाची झाडाझडती घेऊन नियमानुसार ई-कचरा भंगारात काढल्याची प्रतिक्रिया दिली होती.