- स्नेहा पावसकर ठाणे : कॉलेज फेस्टिव्हलमधून सुरू केलेली फोटोग्राफी त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आणि न्यूयॉर्क येथे सिनेमॅटोग्राफीचे प्रशिक्षण घेतल्यावर त्याने तयार केलेल्या ‘मर्सी’ या शॉर्ट फिल्मने त्याला हॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. वैभव हंडोरे याच्या यशाची ही कथा. मूळचा कल्याणकर आणि शिक्षणानिमित्त अमेरिकेत असलेल्या वैभवने केलेली मर्सी ही शॉर्ट फिल्म हॉलिवूडची सफर करणार आहे. जागतिक स्तरावरील दोन महोत्सवांसाठी या शॉर्ट फिल्मची निवड झाली आहे.वैभव याने के.जे. सोमय्यातून बीएमएमचा कोर्स पूर्ण केला. फोटोग्राफीमध्ये आवड निर्माण झाली आणि मग करिअरच्या दृष्टीने त्याने फोटोग्राफीचे तंत्रशुद्ध शिक्षण घ्यायचे ठरवले. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फोटोग्राफीमधून कोर्स पूर्ण केल्यावर सिनेमॅटोग्राफीचेही शिक्षण घेतले. हॉलिवूडमध्ये काम कसे चालते, हे शिकण्यासाठी त्याने अमेरिकेतील न्यूयॉर्क फिल्म अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. सध्या तो इंटर्नशिप करतो आहे. याचदरम्यान त्याने ‘मर्सी’ ही शॉर्ट फिल्म तयार केली. आयुष्यात येणाऱ्या विविध संकटांत एक पत्नी आपल्या पतीला पाठिंबा देताना स्वत: किती संघर्ष करते, यावर आधारित ही फिल्म आहे. विशेष म्हणजे वैभवने ही फिल्म ३५ एमएमच्या फिल्म कॅमेऱ्यातून आणि एका दिवसात शूट केलेली आहे. वैभवच्या या शॉर्ट फिल्मची लॉस एंजेलिस येथे होणाºया गोल्डन स्टेट फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली असून त्यात ही शॉर्ट फिल्म चायनीज थिएटरमध्ये दाखवली जाणार आहे. तसेच बेस्ट युरोपियन सिनेमॅटोग्राफी अॅवॉर्डसाठीही त्याचे नॉमिनेशन झाले आहे. या दोन्ही महोत्सवांसाठी माझ्या शॉर्ट फिल्मची झालेली निवड ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. मी केवळ आवड म्हणून उत्तम काम करण्याचा प्रयत्न करतो.यापुढेही इंडियन फिल्म इंटस्ट्री आणि हॉलिवूड दोन्हीसाठी काम करण्याची माझी इच्छा आहे, असे मत वैभवने व्यक्त केले.
वैभवच्या शॉर्ट फिल्मचे जागतिक महोत्सवात स्क्रिनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 6:18 AM