प्रशांत माने : लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने काही निर्बंध घातले आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास बंधनकारक केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांतर्फे कल्याण-डोंबिवली शहरांच्या वेशीवर वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. एका अधिकाऱ्यासह सात पोलिसांच्या पथकाकडून अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांवर २४ तास वॉच ठेवला जात असून, ई-पास व कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे का, याची तपासणी केली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हाबंदी लागू केली आहे. वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, कुटुंबातील निधन असे अत्यावश्यक कारण असेल तरच खासगी मोटार व इतर वाहनांद्वारे आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी नागरिकांना दिली जात आहे; परंतु त्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. कल्याण-डोंबिवलीत बाहेरून येणाऱ्या वाहनांचा आढावा घेता पोलीस परिमंडळ ३ च्या हद्दीनुसार डोंबिवली नजीकच्या खोणी आणि कल्याणजवळील गांधारी पूल येथे चेकपोस्ट उभारले आहेत. ‘लोकमत’ने बुधवारी या दोन्ही चेकपोस्टच्या ठिकाणी पाहणी केली असता भरदुपारी तेथे वाहनांची कसून तपासणी सुरू होती. यात ट्रक, खासगी बस, मोटार आणि दुचाकी थांबवून विचारपूस केली जात होती. ई-पासची तपासणी करताना मास्क लावला आहे का, तसेच वाहनांमध्ये कोविडकाळातील आसन क्षमतेच्या नियमांचे पालन केले आहे का? याचीही पाहणी केली जात होती. विशेष म्हणजे कोरोनाची चाचणी केली आहे का? हे जाणून घेण्यासाठी आरटीपीसीआर रिपोर्ट पाहिला जात होता. खोणी चेकपोस्टवर पोलीस अधिकारी बी. वंजारे तर गांधारी चेकपोस्टवर अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी सुरू होती.
खडकपाडा आणि मानपाडा पोलिसांकडून सुरू असलेल्या या मोहिमेत वाहतूक पोलिसांचेही त्यांना सहकार्य लाभत होते. कोविड नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल केले जातात, तर मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आकारला जात असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वंजारे यांनी दिली.
२,९२९ अर्ज बाद
कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकांनी बाहेरील जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पाससाठी अर्ज केले आहेत. आतापर्यंत तीन हजार ६०० जणांची अर्ज केले होते; परंतु नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता न केली गेल्यामुळे यातील २,९२९ अर्ज बाद ठरविले गेले आहेत. उर्वरित अर्जांची छाननी सुरू असून, आतापर्यंत ४१० अर्ज वैध ठरल्याने त्यांना ई-पास दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.
----------------------------