डाेंबिवली : शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या शिल्पांकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाले आहे. साहित्य संमेलनाच्या शिल्पाच्या ठिकाणी असलेल्या लेखणीच्या तुटलेल्या भागाकडे कानाडोळा झाला असताना शिल्पाच्या आजूबाजूला रानटी गवत उगवले आहे. ठाकुर्लीतील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर शहर स्वच्छतेचा संदेश देणारे बोधचिन्हही नामशेष झाले आहे.
हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात ३ ते ५ फेब्रुवारी २०१७ दरम्यान अखिल मराठी साहित्य संमेलन पार पडले. संमेलनाच्या निमित्ताने क्रीडासंकुलाला लागूनच असलेल्या मुख्य चौकातही शिल्प उभारलेले होते. सध्या हे शिल्प भग्नावस्थेत आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये या शिल्पाच्या लेखणीचा भाग तुटला होता. ताे अद्याप तसाच आहे.
इथे कोणीतरी गणपतीची मूर्ती आणून ठेवली असून शिल्पावरील अक्षरांची मोडतोड झाली आहे. जाहिराती चिकटवण्यासाठीही शिल्पाचा वापर होऊ लागला आहे. कोरोनाकाळात यंत्रणा व्यस्त असली, तरी आता व्यवहार सुरळीत सुरू झाले आहे. या शिल्पाची एकूणच परिस्थिती पाहता साहित्यप्रेमींनाही याचा विसर पडल्याचे दिसत आहे.