अंबरनाथ : अंबरनाथच्या शासकीय छाया रुग्णालयात चुकीच्या औषधोपचारामुळे १२ रुग्णांना रक्ताच्या उलट्या झाल्याची घटना सोमवारी रात्री घडल्यानंतर, अन्न औषध प्रशासनाने येथील औषधांचा साठा मंगळवारी सील केला आहे. औषधांचे काही नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. रुग्णालय प्रशासनानाकडून या सारवासारव करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.अंबरनाथमधील शासकीय छाया रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या १२ महिलांना सेफ्ट्रायक्झोन नावाचे इंजेक्शन दिले. यानंतर सर्व महिलांना उलट्या सुरू झाल्या. काही महिलांना रक्ताच्या उलट्या झाल्या. महिलांच्या कक्षातील सर्वच रुग्णांना त्रास सुरु झाल्याने, औषधांची रिएक्शन झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला. रुग्णांना मुदतबाह्य औषध दिल्याच्या आरोपांचा रुग्णालय प्रशासनाने इन्कार केला. सर्व रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला.इंजेक्शनमुळे बाधित झालेल्या शितल दोंदे, नेहा गुप्ते, खुशबू मुरगन, जानकी भगत, मेहबुबी शेख, मंजू मुबांनदा, रमा चिंडे, सानिया भट, कोमल पष्टे, रिझवाना बागवान, दिपू गौड, दुर्गा भगत यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालय आणि क्रिटीकेअर रुग्णालयात हलविले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलाश पवार यांनी मंगळवारी रुग्णांची पाहणी केली. जे इंजेक्शन दिल्याने रुग्णांना त्रास झाला, ते तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश त्यांनी दिले.या प्रकारानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने येथील औषधांची पाहणी करुन ती तपासणीसाठी पाठवली आहेत. या औषधांचा वापर टाळण्याच्या सूचना जिल्हा वैद्यकीय विभागाने दिले आहेत.ज्या इंजेक्शनचा वापर राज्यात सर्वत्र होत आहे, त्या इंजेक्शनचा त्रास केवळ अंबरनाथमधील रुग्णांनाच झाल्याने नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. येथील वैद्यकिय परिचारीका, डॉक्टरांकडून चुका झाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नेमकी चुक काय झाली याची कल्पना आपल्याला नसल्याचे रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी सांगितले.या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. रुग्णांवर योग्य उपचार सुरु आहेत. खाजगी रुग्णालयातील रुग्णांच्या उपचाराचा खर्च शासन करणार आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.- एकनाथ शिंदे, मंत्रीछाया रुग्णालयातील सर्व रुग्णांना सेफ्ट्रायक्झोन हे औषध दिले जात होते. मात्र केवळ महिला वार्डातील रुग्णांनाच त्याचा त्रास झाला. त्यामुळे त्याचे नेमके कारण शोधणे गरजेचे आहे. याप्रकरणी दोषींवर योग्य कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच औषध हाताळताना योग्य दक्षता घेण्याची गरज आहे.- डॉ. बालाजी किणीकर, आमदारसेफ्ट्रायक्झोन हे औषध रुग्णांना देण्यात आले. मात्र त्रास महिला वार्डातील रुग्णांनाच झाला. ते दिल्यावर रुग्णांमध्ये मळमळणे, उलटी होणे अशी लक्षणे दिसतात. मात्र महिला रुग्णांना झालेला त्रास हा जास्तच आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत. रुग्णालयातील औषधे तसेच रुग्णांच्या उलटीचे नमुनेही तपासणीसाठी पाठविले आहेत.- शशिकांत दोडे,वैद्यकीय अधिकारी, छाया रुग्णालय
अंबरनाथच्या छाया रुग्णालयातील औषधे सील, रुग्णांची प्रकृती स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 1:15 AM