राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील विरोधी पक्ष नेता नियुक्तीसह दालनाचा तिढा महापौरांनी कायम ठेवल्याने संतप्त शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी २२ जानेवारीला पालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील दालनाचा परस्पर ताबा घेतला. हा प्रकार बेकायदेशीर ठरवित प्रशासनाने त्या दालनाला पुन्हा सील ठोकल्याने दुसऱ्या दिवशी कामकाज सुरु करण्यासाठी आलेल्या सेनेची मात्र चांगलीच पंचाईत झाली.
यामुळे प्रशासनाकडुन सेनेची आक्रमकता सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली चिरडून टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पालिकेत विरोधकांमधील पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या सेनेला नियमानुसार विरोधी पक्ष नेता पद मिळाले असले तरी नियमातील तरतुदीत शाब्दीक खेळी करुन महापौर डिंपल मेहता यांनी या पदावरील नियुक्ती ताटकळत ठेवली आहे. शिवसेनेने २०१७ मधील सत्तास्थापनेनंतर पहिल्या महासभेत त्या पदावरील नियुक्तीच्या घोषणेसाठी महापौरांना नगरसेवक राजू भोईर यांच्या नावाची शिफारस केली. महापौरांनी त्याची घोषणा पुढील महासभेत करण्याचे मान्य करीत सेनेची बोळवण केली. दुसऱ्या महासभेपुर्वी स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांनी महापौरांना पत्रव्यवहार करुन त्यात या पदावरील नियुक्ती महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतूदीनुसार महापौरांकडुन विरोधी पक्षातील ज्या नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या नेत्याचीच विरोधी पक्ष नेता पदावर नियुक्ती करण्याची मागणी केली. यामुळे महापौरांनी तांत्रिक अडचण उपस्थित करुन पाटील यांच्या पत्राच्या अनुषंगाने राज्य सरकारकडे अभिप्राय मागविला. तो नुकताच महापौरांना प्राप्त झाला असुन त्यात विरोधी पक्ष नेता पदाचा निर्णय त्यांचाच असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान भाजपा सत्ताधाऱ्यांनी पालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील विरोधी पक्ष नेत्याचे दालन तळमजल्यावर स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सेनेची चांगलीच पंचाईत झाल्याने पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महापौर दालनात प्रवेश करुन अनौपचारिकपणे भोईर यांच्या नियुक्तीची घोषणा केली. तसेच महापौरांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी सरकारच्या अभिप्रायानंतर नियुक्तीची घोषणा करण्याचे महापौरांनी मान्य करीत पुन्हा सेनेची बोळवण केली. अभिप्राय आल्यानंतर मात्र महापौरांनी दालनाचा प्रश्न उपस्थित केल्याने २२ जानेवारीला सेनेसह काँग्रसच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील बंदिस्त दालन खुले करुन त्याचा ताबा घेतला. तसेच त्यात भोईर यांची नियुक्ती झाल्याचे अनौपचारिक सोपस्कार पार पाडले. सेनेच्या या दालन नाट्यानंतर प्रशासनाने त्या दालनालाच सील ठोकले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा दालनात कामकाज सुरु करण्याच्या उद्देशाने आलेल्या सेनेच्या नगरसेवकांचा, प्रशासनाने दालनाला ठोकलेले सील पाहुन भ्रमनिरास झाला. दालनाला लावलेले सील न काढता सेनेने एक पाऊल मागे घेत नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या दालनाकडे मोर्चा वळविला.