ठाणे : शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत असलेल्या तसेच शहरात ५०० मीटर हद्दीत असलेल्या अनेक लोकप्रिय बार, हॉटेलना न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसला असून त्यांचे शटर डाउन झाले आहे. ठाण्यातील १५० ते २०० बार, रेस्टॉरंट, पब यांना हा निर्णय मारक ठरल्याची माहिती ठाणे हॉटेल, बार ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुशल भंडारी यांनी ‘लोकमत’ला दिली. यामुळे केवळ बारमालकांचेच नव्हे, तर तेथील कामगार-कर्मचारी, वेगवेगळे पुरवठादार, रिक्षावाले अशा अनेकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. प्रत्येक पब अथवा बारकडून सरकार तब्बल ५२ प्रकारचे कर वसूल करते. त्यामुळे शासनाचे उत्पन्नदेखील बुडणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत म्हणजेच मुलुंड मार्गावर, घोडबंदर, कळवा, खारेगाव, मुंब्रा, शीळ आदी भागांत सुमारे १५० ते २०० बार हे हाय वे ला लागून आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर ते सील करण्याचे काम सुरू झाले आहे. ठाण्यातील महामार्गापासून ५०० मीटरच्या अंतरावर असलेले शहरातील गल्लीबोळातील बार, रेस्टॉरंट, वाइन शॉप हेही या निर्णयामुळे बंद झाले आहेत किंवा त्यांनाही सील ठोकण्याची कारवाई सुरू झाली आहे. प्रत्येक बारमध्ये सुमारे ४० ते ५० जणांचा स्टॉफ आहे. त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. शिवाय भाजीपाला, मद्य, खाद्यपदार्थ, शीतपेये आदी पन्नासच्या आसपास पुरवठादारांकडून बार, पबला जिन्नस पुरवले जातात. त्यांचादेखील रोजगार बंद होणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले. काहींनी नव्याने या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. आता त्यांना किमान दीड ते पाच कोटींचा फटका बसला आहे. या सर्वांबरोबरच शासनाचा आणि महापालिकेचादेखील महसूल बुडणार आहे. बारवाल्यांकडून तब्बल ५२ प्रकारचा कर वसूल केला जातो. आता बारच सील झाले, तर हा टॅक्सही बंद होणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा निर्णय सरकारला डोईजड होईल असे, भंडारी म्हणाले. शासनाने आता योग्य तो निर्णय घ्यावा आणि बारमालकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)
ठाणे शहरातील बारही झाले सील
By admin | Published: April 01, 2017 11:42 PM