ठाणे : ठाण्यात डम्पिंगचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अजूनही सुटलेला नसून मुंबई महापालिकेने त्यांच्या हद्दीच्या बाहेर अंबरनाथ या ठिकाणी डम्पिंग सुरु केले असल्याने त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेनेही आपल्या हद्दीबाहेरच्या जागेचा शोध सुरु केला आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षी या संदर्भातील ठरावदेखील झाला होता. परंतु, त्यानंतर त्याचे काय झाले याचे उत्तर प्रशासनाकडे नसले तरी देखील आता नव्याने लोकवस्तीपासून दूर असलेल्या जागेचा शोध पालिकेने सुरु केला आहे. आता ती मिळणार का? की केवळ आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाने खेळलेला हा जुमला आहे, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीत एक हजार मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती आजघडीला होत आहे. सध्या तो दिवा डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात आहे. परंतु, आम्ही अजून किती वर्षे या कचऱ्याची दुर्गंधी सहन करायची असा सवाल येथील स्थानिक नगरसेवकांनी केला होता. त्यानंतर मागील आठवड्यात महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिव्यातील डम्पिंग ग्राउंड हटविण्याचे आश्वासन महापौरांनी दिले होते. त्यासाठी इतर ठिकाणी जागेचा शोध घेण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार आता पालिकेने शहराबाहेरील जागेचा शोध सुरु केला आहे.
विशेष म्हणजे दर महापालिका, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिवा डम्पिंगचा प्रश्न आ वासून उभा असतो, त्यामुळे दर पाच वर्षांनी वेगवेगळे पर्याय सांगून दिव्यातील डम्पिंग हटविण्याचे आश्वासन प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेकडून दिले जात आहे. त्यानुसार आतादेखील तसेच आश्वासन दिले गेले की काय? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. एवढ्या वर्षांत पालिकेला जागेचा शोध का? घेता आला नाही, डायघर येथे डम्पिंगच्या जागेवर अद्यापही ते सुरु करता आलेले नाही. त्यामुळे आता तरी जागा मिळेल का? हादेखील प्रश्नच आहे.
वन विभागाची जागा अडकली मंजुरीच्या प्रतीक्षेत
मागील पाच वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेने दिव्यातील डम्पिंगला पर्याय म्हणून खर्डी येथील वनविभागाच्या जागेवर १०० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, पाच वर्षे उलटत आली तरी महापालिकेला याठिकाणी प्रकल्प राबविता आलेला नाही. आतादेखील या प्रकल्पाची अंतिम मंजुरी शिल्लक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
डम्पिंगचा शोध
ठाणे महापालिका हद्दीबाहेर आता महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या माध्यमातून जागेचा शोध सुरु झाला आहे. ग्रामीण भागात सुमारे १५ ते २० एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. ही जागा भाडेतत्वावर किंवा विकत घेण्याची देखील महापालिकेची तयारी आहे. दुसरीकडे शहरात देखील लोकवस्ती पासून दूर असलेली जागा उपलब्ध होऊ शकते का? याचा शोध शहर विकास विभागाच्या माध्यमातून सुरु झाला आहे.