- जान्हवी मोर्येडोंबिवली - भाषा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांत कार्यरत असलेली महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) डोंबिवली शाखा ३० वर्षांपासून सुरू आहे. ही शाखा कार्यालयासाठी जागेच्या शोधात असून त्यासाठी त्यांनी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्याकडे बुधवारी निवेदन दिले.महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही ११३ वर्षे जुनी संस्था आहे. या संस्थेच्या डोंबिवली शाखेने डोंबिवलीतील विभागीय साहित्य संमेलन आणि २०१७ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात मोठा सहभाग नोंदवला होता. समाजातील सर्वच घटकांसाठी ही शाखा कार्यरत असली, तरी त्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थी आणि तरुणांना साहित्याकडे वळवणे, हा आहे. ज्येष्ठ नागरिक मधुकर भागवत यांनी संस्थेला लहानशी जागा दिली आहे. त्या जागेतून ते काम करतात. तसेच सदस्यांच्या घरातून काम केले जाते. साहित्यविषयक अनेक उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस आहे. सभापती म्हात्रे यांना निवेदन देताना मसापचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, संस्थेचे सदस्य दीपाली काळे, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे आदी मान्यवर उपस्थित होते.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान २०१७ मध्ये आगरी युथ फोरमला मिळाला होता. त्यावेळी मसापने आगरी युथ फोरमला घेऊन एक छोटेखानी कार्यक्रम आता अस्तित्वात असलेल्या मसाप शाखेच्या जागेत केला होता. त्यावेळी मसापच्या अडचणी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी ऐकून घेतल्या होत्या. मसापला जागा देण्याचा मानस व्यक्त केला होता. महापालिकेकडून साहित्य संमेलनाच्या कार्यालयासाठी जगन्नाथ प्लाझा येथील वाचनालयासाठी आरक्षित असलेली जागा दिली गेली होती. पण, मसापच्या जागेचा विचार झालेला नव्हता.जागेच्या मागणीसाठी मसाप सभापतींकडे गेले, तेव्हा त्या शिष्टमंडळात गुलाब वझे होते. त्यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला. विशेष म्हणजे महापालिकेने विविध बिल्डरांना विकासाची मान्यता देताना सर्वसमावेशक आरक्षणात काही जागा देण्याचे करार केलेले आहेत. त्यानुसार, कल्याणमधील काही जागा पोलीस ठाणे कार्यालयांना दिल्या गेल्या आहेत. अनेक जागा साहित्यिक व सांस्कृतिक केंद्रासाठी आरक्षित आहे. डोंबिवलीतही सर्वसमावेशक आरक्षणात विकसित केलेल्या अनेक इमारतींत महापालिकेच्या हक्काच्या जागा पडून आहे. याचा आढावा शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी नुकताच घेतला आहे. या जागेपैकी एखादी जागा मसापला उपलब्ध करून दिली जाऊ शकते.सांस्कृतिक नगरी म्हणून डोंबिवली शहर ओळखले जाते. मात्र असे असूनही मसापच्या शाखेला कार्यालयासाठी जागा मिळत नसल्याने सामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील राजकीय मंडळींनी पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत मसापला जागा मिळवून द्यावी अशी मागणी डोंबिवलीच्या साहित्य वर्तुळातून केली जात आहे.स्थलांतरित पोलीस ठाण्यातील जागेची मागणीविष्णूनगर पोलीस ठाणे अन्यत्र स्थालांतरित करण्यात आल्याने त्याठिकाणी काही खोल्या रिकाम्या झाल्या आहेत. याशिवाय, विष्णूनगर येथील जकातनाका बंद झाल्याने त्या इमारतीतील खोल्या रिकाम्या आहेत. यातील एखादी जागा संस्थेला कार्यालयासाठी मिळावी, अशी संस्थेची मागणी आहे. यासंदर्भात ७ जानेवारीला आयुक्तांसह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही निवेदन दिले आहे. स्थायी समिती सभापती म्हात्रे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने संस्थेला लवकरात लवकर जागा मिळेल, अशी आशा आहे.
मसाप शाखा कार्यालयासाठी जागेच्या शोधात, स्थायी समिती सभापतींना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 2:57 AM