ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरुन सलमान अब्दुल खान या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या घटनेला ४८ तास उलटूनही त्याचा शोध लागलेला नाही. मुंब्रा पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या चार ते पाच वेगवेगळ्या पथकांनी सोमवारी दिवसभरात अनेक सीसीटीव्हींची पडताळणी केली. मात्र, शोध न लागल्याने मुलाच्या पालकांनीही चिंता व्यक्त केली.मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार देतेवेळी मुलाचे वडील अब्दुल खान यांच्या मेहुण्याची मुलगी सोनिया (९) हिने आधी एका रिक्षातून आलेल्या व्यक्तीने मुलाला तिच्या ताब्यातून घेऊन गेल्याची माहिती दिली. त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाच्या चौकशीत मात्र तिने एका बुरखा परिधान केलेल्या महिलेने दहा रुपये देऊन कबाब पाव आणण्यास सांगितले. त्यानंतर ती मुलाला घेऊन गायब झाल्याची माहिती दिली. दोन वेगवेगळी विधाने या मुलीने केल्यामुळे पोलिसांच्या तपासातही अडथळा आला. शिवाय, मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरील आणि मस्जिदसमोरील सीसीटीव्ही बंद अवस्थेत आढळले. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही चारही पथकांनी सोमवारी आणि मंगळवारी पडताळले. ४० ते ५० जणांची चौकशीही केली. मात्र, या महिलेची माहिती अद्याप तपास पथकाच्या हाती लागलेली नाही.३ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकरणाला आता ४८ तास उलटूनही काहीच धागादोरा हाती न लागल्यामुळे या मुलाच्या पालकांनी चिंता व्यक्त केली. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही या मुलाला शोधण्याचे आदेश मुंब्रा आणि गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्याने दोन्ही पथकांकडून कसून तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंब्य्रातील ‘त्या’ दहा महिन्यांच्या मुलाचा शोध सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 10:20 PM
मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरुन सलमान खान या दहा महिन्यांच्या मुलाचे एका महिलेने अपहरण केल्याची घटना रविवारी घडली. ४८ तास उलटूनही त्याचा काहीच शोध न लागल्याने मुलाच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देमुंब्रा आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून समांतर तपासअनेक सीसीटीव्हींची पडताळणीशोध न लागल्याने पालकांमध्ये चिंता