ठाणे : कोरोनामुळे पालघरमधील सफाळे भागातील एकाचा मंगळवारी मृत्यु झाला आहे. तो ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील खाजगी कंपनीत कामाला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील आता ११० जणांचा शोध घेण्याची सुरवात ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी पालिकेला या ११० जणांची यादी दिली असून ते सर्वजण ठाण्याच्या विविध भागात वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे. तर यातील काही कामगार हे नवी मुंबई, तर काही कामगार मुलुंड या भागातील असल्याची माहितीही समोर येत आहे. मंगळवारी सांयकाळी पालघर भागातील सफाळे येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. सदरचा व्यक्ती हा ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील एका खाजगी कंपनीत कामाला होता. परंतु आता त्याच्या मृत्युमुळे या कंपनीत काम करणाऱ्या सर्वांचाच शोध सुरु झाला आहे. सदर पालघर येथील व्यक्ती ही १७ मार्च पर्यंत कामाला येत होता, अशीही माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे ठाण्यात ही माहिती समजताच महापौर म्हस्के यांनी संबधींत कंपनीतील कामगारांची यादी मागवून घेतली असून ती पालिकेच्य स्वोाधीन केली आहे. या यादीत ११० जणांचा समावेश असून आता त्यांचा शोध घेण्यासाठी पालिकेने टीम तयार केल्या आहेत. हे ११० कामगार ठाण्यातील हाजुरी, कळवा, किसननगर, पोखरण रोड. २, अंिबका नगर, आनंद नगर, वागळे इस्टेट आदींसह इतर भागात वास्तव्यास असून आता त्यांचा शोध सुरु झाला आहे. तर काही कामगार हे नवीमुंबईतील तर काही नाहुर, मुलुंड भागातील असल्याची माहितीही महापौरांनी दिली. त्यातील बहुतेक कामगार हे झोपडपटटी भागात राहणारे असल्याने आता पालिकेची या सर्वांना शोधण्यासाठी तारेवरची कसरत सुरु झाली आहे.
पालघरच्या त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील ११० जणांचा शोध सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 1:55 PM