कल्याण : केडीएमसीच्या रामबाग खडक प्रभागात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सचिन बासरे यांच्या बिनविरोध झालेल्या निवडीवर सोमवारी शिक्कामोर्तब झाले.
२०१५ मध्ये झालेल्या केडीएमसीच्या निवडणुकीत या प्रभागात शिवसेना, भाजप, काँग्रेस, मनसे आणि बहुजन विकास आघाडीने निवडणूक लढविली होती. खरी लढत शिवसेना आणि भाजपमध्ये झाली होती. मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या प्रभागात शिवसेनेच्या वैजयंती गुजर घोलप यांनी भाजपच्या गौरव गुजर यांचा पराभव केला होता. मात्र, गौरव गुजर यांनी घोलप यांच्या जात प्रमाणपत्राला हरकत घेतली होती. यात घोलप यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले.दरम्यान, या प्रभागात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून सचिन बासरे यांनी, तसेच युवा सेनेचे पदाधिकारी प्रशांत पाटील यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. अखेर शुक्रवारी पाटील यांनी उमेदवारी माघारी घेण्याचा अर्ज दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पाटील यांच्या माघारीच्या अर्जामुळे २३ जूनला होणारी पोटनिवडणूक टळली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बासरे यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता या प्रभागातील नागरीप्रश्न सुटण्याची आशा आहे.परिवहन, शिक्षण सभापतींची आज घोषणाच्केडीएमसीच्या परिवहन, शिक्षण आणि दहा प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक बुधवारी होत आहे. परंतु, सोमवारी या समित्यांसाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने समित्यांच्या सभापतीपदावर संबंधितांची बिनविरोध निवड झाली आहे.च्याबाबतची अधिकृत घोषणाही बुधवारी निवडणुकीच्या दिवशी होणार आहे. तत्पूर्वी उमेदवारी अर्जांची छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित राहणार आहेत.