कल्याण : कल्याण-भिवंडी मार्गावरील कल्याण खाडीवरील दुर्गाडी येथील सहापदरी पुलाचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे एमएमआरडीएने कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले आहे. एमएमआरडीएने पुन्हा कंत्राटदार नेमण्यासाठी ६१ कोटी रुपये खर्चाची निविदा काढली आहे. निविदापूर्व बैठक ७ डिसेंबरला होणार आहे.दुर्गाडी येथील कल्याण खाडीवरील सध्याचा पूल अपुरा पडत आहे. त्यामुळे त्याला समांतर सहापदरी पूल बांधण्यास एमएमआरडीएच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली होती. जुलै २०१६ मध्ये पुलाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला होता. ७३ कोटी रुपये खर्चाचा हा पूल १८ महिन्यांत बांधण्याची मुदत होती. पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदार सुप्रीमो कंपनीने खाडीत दोन पोल उभारले. मात्र, त्याला मेरीटाइम बोर्डाने हरकत घेतली. त्यानुसार, नवा नकाशा तयार करून त्याचे वॉटर स्पॅन कसे असतील, याच्या सूचना दिल्या. त्यानंतर, कंत्राटदाराने पुन्हा मंजुरी घेऊन कामाला सुरुवात केली. मात्र, कंत्राटदाराकडून अत्यंत संथगतीने काम सुरू होते. त्यामुळे जुलैमध्ये एमएमआरडीएच्या मुंबईतील कार्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनीता राणे यांनी पुलाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पुलाचे काम रखडले असल्याचे मान्य करत कंत्राटदार प्रत्यक्ष कामाला १ आॅक्टोबरपासून सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात आले.परंतु, पुलाचे काम वेळेत पूर्ण होत नसल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला होता. तसेच सुप्रीमो कंपनीचे कंत्राट रद्द करून नवा कंत्राटदार नेमण्याची मागणी केली होती.१ आॅक्टोबरनंतरही कंपनीने काम सुरू न केल्याने एमएमआरडीएने सुप्रीमोचे कंत्राट रद्द केले. आता पुलाच्या कामासाठी ६१ कोटी ३३ लाख रुपयांची निविदा काढली आहे. निविदा भरण्यासाठी इच्छुक असलेल्या कंत्राट कंपन्यांसोबत निविदापूर्व बैठक ७ डिसेंबरला होणार आहे. निविदा भरण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबरला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नेमणूक, त्याला कार्यादेश देण्यास २०१९ उजाडणार आहे. हे काम करण्यासाठी पुन्हा किमान १८ महिन्यांची मुदत दिली, तरी पूल २०२० मध्ये पूर्ण होईल. त्यामुळे कल्याण-भिवंडी मार्गावरील नागरिक व वाहनचालकांची तोपर्यंत वाहतूककोंडीतून सुटका होणार नाही.
दुर्गाडी पुलासाठी दुसरा कंत्राटदार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 12:40 AM