ठाणे : कोपरी पूर्व येथे जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसच्या वाहिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी दुपारी पाचपाखाडी येथे जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसची वाहिनी फुटल्याने गॅसगळतीचा प्रकार पुन्हा घडला. यामुळे सुमारे ६० ते ७० कुटुंबीयांना नाहक फटका बसला. सुदैवाने, यात इतर कोणतीही हानी झाली नाही.
शहरातील पाचपाखाडी येथील सुंदरम् सोसायटीजवळ ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने ड्रेनेजचे खोदकाम गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास जेसीबीद्वारे सुरू होते. याचदरम्यान जेसीबीचा गॅसवाहिनीला धक्का लागल्याने ती फुटून गळती सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान तसेच महानगर गॅसच्या पथकाने धाव घेत तातडीने ही गळती थांबविली. तसेच दुरुस्तीचे कामही हाती घेतले. या वेळी एक फायर वाहन आणि एक रेस्क्यू वाहन पाचारण केले होते. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर दोन तासांनी गॅसपुरवठा सुरळीत झाला. यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. बुधवारीदेखील कोपरी पूर्व येथे उड्डाणपुलासाठी खोदकाम सुरू असताना, जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसच्या वाहिनीचे नुकसान झाले होते. यातही सुमारे १५० गॅस ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
...................
ज्या ठिकाणी ड्रेनेजसाठी महापालिकेच्या ठेकेदारांकडून अशा प्रकारे काम करण्यात येत आहे, त्यांनी आधी महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून खोदकाम करणे अपेक्षित आहे. ते होत नसल्यामुळे या घटना वारंवार होत असल्याची नाराजी स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.