ठाणे : गेल्या वर्षी मे महिन्यात कडक लॉकडाऊन असतानाही सरकारने ६ मे २०२० रोजी वाईनशॉप उघडण्यास परवानगी दिली आणि तळीरामांची वाईनशॉपबाहेर भरमसाट गर्दी उसळली होती. यंदाही लॉकडाऊन सुरू आहे. मात्र सरकारने गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. तरीही तळीराम वाईनशॉपबाहेर घुटमळताना दिसत आहेत. त्याचाच गैरफायदा घेत, १५० रुपयांची क्वॉर्टर १८० ते २०० रुपयांना विकून काळाबाजार केला जात आहे.
सरकारने दुसऱ्या टप्प्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी १५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे कामधंदे बंद पडले आहेत. सोशल डिस्टसिंगसाठी शासनाने अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र तळीरामांसाठी ऑनलाइन मद्य खरेदीचा पर्याय ठेवला आहे. वाईनशॉपबाहेरची गर्दी टाळण्यासाठी घरपोच ऑनलाइन मद्यविक्री सुरू आहे. मात्र ऑनलाइन व्यवहार करण्यात ज्यांना काही अडचणी आहेत, असे तळीराम वाईनशॉपबाहेर घुटमळताना दिसत आहेत. मग वाईनशॉपच्या दारावर असलेले कर्मचारी कानाकोपऱ्यात ग्राहकांना गाठून वाढीव दरात मद्यविक्री करताना दिसत आहेत. अशा वेळी सदर वाईनशॉपबाहेर हे तळीराम गर्दी करीत असल्याने त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. त्यामुळे शासनाने सरसकट वॉईनशॉप उघडून गेल्या वर्षीप्रमाणे रांगा लावून आणि सोशल डिस्टन्स पाळून मद्यविक्री करण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.
गेल्या वर्षी ६ मे रोजी राज्यातील वॉईनशॉप उघडल्यानंतर चार महिने प्रतीक्षा केलेल्या तळीरामांची एकच झुंबळ उडालेली दिसली. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला दिसला. सरकारला मद्यविक्रीतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळेच अत्यावश्यक काळात केवळ मद्यविक्री सुरू करून तळीरामांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला. यंदाही सरकारने तशी मुभा देत ऑनलाइन विक्रीवर भर दिला. मात्र अनेक वाईनशॉपवाले कोविड नियमांना फाटा देत बेकायदा दारूविक्री करीत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार पोलिसांच्या देखरेखीत सुरू असल्याचे चित्र अनेक वाईनशॉपबाहेर दिसत आहेत.