कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अवघ्या दोन महिने १० दिवसांत ३८२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही लाट १५ मे नंतर ओसरणार असली तरी पुन्हा जुलै, ऑगस्टमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.
कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये सुरू झाली. त्यावेळी मनपा हद्दीत दिवसाला ३०० ते ४५० रुग्ण आढळत होते. मृत्यूचे प्रमाण आटोक्यात होते. जुलै २०२० मध्ये एका दिवसात ६६४ रुग्ण आढळले होते. दिवाळीनंतर रुग्णसंख्या घटू लागली होती. जानेवारीत पहिली लाट ओसरल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, १७ फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत दररोज एक ते दोन हजारांच्या संख्येने रुग्ण आढळत होते. त्यामुळे रुग्णालयात बेड, तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची उपलब्धता, पुरवठ्याच्या ऑडिटसाठी पथके नेमली गेली. मात्र, तुटवडा इतका जास्त होता की, मागणी आणि पुरवठा यात प्रचंड तफावत होती. त्यामुळे अनेक कोरोना रुग्णांना त्यांचे प्राण गमवावे लागले.
तिसऱ्या लाटेसाठी तयारी सुरू
- पहिल्या लाटेत जास्त वय असलेल्यांना कोरोनाचा जास्त फटका बसला. दुसऱ्या लाटेत ३० ते ४५ वयोगटांतील तरुण बाधित झाले, तर येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
- तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी लहान मुलांकरिता विभा कंपनीच्या जागेत उभारल्या जाणाऱ्या कोविड रुग्णालयात ५० टक्के बेड मुलांसाठी आरक्षित ठेवले जाणार आहेत, तसेच मुलांसाठी आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित आहे.
- मुलांना कोरोनाची लागण होणार असल्याने आधीच औषधांचा साठा मागविण्याची तयारी करण्यात आली आहे. मनपाच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात प्रत्येकी एक याप्रमाणे दोन बालरोगतज्ज्ञ आहेत; परंतु प्रत्येक रुग्णालयास प्रत्येकी दोन याप्रमाणे चार बालरोगतज्ज्ञ भरती केले जाणार आहेत. दोन्ही रुग्णालयात प्रत्येकी १० बेड मुलांसाठी ठेवले जाणार असल्याची माहिती मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली.
------------------