ठाणे : राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जरी समझोता झाला असला, तरी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आजही कायम असल्याचे दिसत आहे. रविवारी येथील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या १० आणि काँग्रेसच्या १० पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची गुप्त बैठक आयोजित केली होती. परंतु, यावेळी काँग्रेसमधील पूर्णेकर गटातील काही पदाधिकारी हजर झाल्याने काँग्रेसचे पुन्हा दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले. यावेळी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांची पूर्णेकर गटातील मंडळींशी चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर, त्यांनी पूर्णेकर गटातील सदस्यांना बाहेरही काढले. एकूणच आघाडी झाली असली, तरी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस कायम असल्याचेच दिसून आले.
राष्ट्रवादीने आनंद परांजपे यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसच्या पूर्णेकर गटाने त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी मात्र असहकार पुकारला होता. यावर मात्र राष्टÑवादीने तोडगा काढून गडकरी रंगायतन येथे झालेल्या मेळाव्यात या नाराजांची मनधरणी केली होती. त्यानंतर संपूर्ण काँग्रेसने राष्टÑवादीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते.
रविवारी राष्टÑवादीचे नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत राष्टÑवादीचे १० आणि काँग्रेसच्या १० अशा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मनोज शिंदे यांच्यासह काही महत्त्वाचे पदाधिकारी हजर होते. त्याच वेळेस पूर्णेकर गटातील काही पदाधिकारीही तीत हजर झाले. परंतु, ही केवळ वरिष्ठ पातळीवर पदाधिकाऱ्यांची बैठक असल्याचे त्यांना सांगण्यात आले. याच मुद्यावरून शिंदे विरुद्ध पूर्णेकर गट पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले.
बैठकीमध्ये पूर्णेकर गट आणि मनोज शिंदे यांच्या गटात चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतरही पूर्णेकर गट शांत न झाल्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. यासंदर्भात मनोज शिंदे यांना छेडले असता, ही बैठक वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाºयांची होती, त्यामुळे त्यांना बोलावण्यात आले नव्हते. परंतु, तरीसुद्धा त्यांनी येथे हजेरी लावल्याने त्यांना नाइलाजास्तव बाहेर काढल्याचे त्यांनी सांगितले.