विनोद राऊत|‘द वन थिंग- द सरप्राईजिंगली सिंपल ट्रूथ बिहाइंड एक्स्ट्रा आॅर्डिनरी रिझल्ट’ या पुस्तकाचे गॅरी केलर आणि जय पापासान हे दोन्ही लेखक प्रथितयश उद्योजक असून आपल्या यशाचे रहस्य त्यांनी या पुस्तकात दिले आहे. एक अत्यंत साधी परंतु उपयुक्त गोष्ट ज्यावर लेखकाने भाष्य केले आहे, ती म्हणजे एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता...मल्टिटास्किंगची सवय झालेल्या प्रत्येकालाच एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे जरा विचित्र वाटते, परंतु ‘द वन थिंग- द सरप्राईजिंगली सिंपल ट्रूथ बिहाइंड एक्स्ट्रा आॅर्डिनरी रिझल्ट’ या पुस्तकाच्या लेखकांच्या मते सर्वच दिग्गज लोकांनी मिळवलेले यश हे त्यांच्या एका वेळी एकच काम करण्याच्या या साध्या सवयीमध्येच आहे. एका वेळी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याने ताणतणावात भर तर पडतेच, मात्र अपेक्षित असे यशसुद्धा मिळत नाही. त्यामुळे उत्साह कमी होतो आणि आयुष्यात मार्ग चुकतो.ज्याला कोणाला आपल्या शैक्षणिक, व्यावसायिक वा आर्थिक क्षेत्रात यश मिळवायचे असेल त्या प्रत्येकाने वाचावे, असे हे पुस्तक आहे. खरं सांगायचं तर यश हे कालबद्ध केलेल्या प्रयत्नाचे फलित असते. हे प्रयत्न एका विशिष्ट दिशेने सातत्याने करत राहिले तर यश हमखास मिळते. परंतु, खूप साऱ्या गोष्टींमध्ये स्वत:ला गुंतवून बरेच जण ऊर्जा खर्च करतात. अशा लोकांना महत्त्वाचा संदेश हे पुस्तक देते, तो म्हणजे एका अशा गोष्टीवर फोकस करा जी गोष्ट तुम्हाला अपेक्षित यश देऊ शकेल. करू शकतो असे बरेच काही असते मात्र करावी, अशी एकच गोष्ट असते आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्याच्या ध्येयाशी निगडित असते. त्या एका गोष्टीवर ऊर्जा केंद्रित केली की, यशाचा राजमार्ग खुला होतो.लेखकाने येथे डॉमिनो इफेक्टबद्दल सांगितले आहे. एका लहान उपक्रमात मिळालेले यश पुढच्या एका नवीन उपक्र माला जन्म देते आणि एकापाठोपाठ यशाची मालिका सुरू होते. त्यासाठी आवश्यकता असते एका लहानशा गोष्टीत यश मिळवण्याची. खूप सारे लोक दररोजच्या कामांची लांबलचक लिस्ट बनवतात आणि ती लिस्ट पाहूनच अर्धेअधिक खचतात. लिस्टमध्ये पेंडिंग कामे वाढत राहतात, प्रत्यक्ष प्रगती शून्य असते. येथे लेखक सुचवतात की आवश्यक आणि अत्यावश्यक अशी विभागणी करून कामांची लिस्ट अगदीच छोटी करावी आणि फक्त यशाकडे नेणारी नेमकी गोष्ट ओळखून त्यानुसार कामांची क्रमवारी ठरवावी. त्यामुळे महत्त्वाचे काम मागे राहत नाही.विल्फ्रेडो पारीटो या इटालियन इकॉनॉमिस्टने सुचवलेल्या सिद्धान्ताचे उदाहरण लेखकद्वयी देतात. पारीटो म्हणतो ८० टक्के यश हे योग्य अशा २० टक्के कामांचे फलित असते. म्हणजेच त्या २० टक्के गोष्टी जर आपण ओळखू शकलो की, ज्या आपल्याला जास्तीतजास्त यश देऊ शकतात. लेखकाने सांगितलेली काही महत्त्वाची मल्टिटास्किंगची सवय टाळणे आवश्यक आहे. आयुष्यात अथक परिश्रम हे केवळ शिस्तीपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे. सर्व काही विसरून कार्यरत राहिले तरच नेत्रदीपक यश मिळते. ध्येय नक्कीच मोठे असावे मात्र त्याला टप्प्याटप्प्याने छोट्याछोट्या उपक्रमात विभागून आणि प्रत्येक टप्प्यावर झोकून देऊन काम करणे यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. लेखक शेवटी हे नमूद करतो की, लोक खूप जास्त विचार करतात, खूप प्लानिंग करतात आणि त्या ओझ्याखाली दडपून जातात. त्याऐवजी जर त्यांनी ‘आज महत्त्वाची तेवढी एक गोष्ट’ ही सवय केली तर यश अशक्य मूळीच नाही.पुस्तकाचे नाव : द वन थिंगलेखक : गॅरी केलर आणि जय पापासान
नेत्रदीपक यशाचे रहस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 5:37 AM