उल्हासनगर : एक दशकाच्या सत्ताकाळात शहराला बकाल करणाऱ्या शिवसेना-भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइं यांची आघाडी करण्याकरिता काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला यांनी पुढाकार घेतला आहे.काँॅग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असून काँग्रेससोबत रिपाइंतील कवाडे, गवई व आंबेडकर यांचा भारिपा हे पक्ष एकत्र आल्यास उल्हासनगरात धर्मनिरपेक्ष पक्षांची सत्ता स्थापन होईल, असा विश्वास लुल्ला यांनी व्यक्त केला. उल्हासनगरातील समीकरणे दररोज बदलत आहेत. ओमी कलानी हे आपल्या टीमसह भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. ओमी कलानी व त्यांची टीम राष्ट्रवादीकडून निवडणूक लढल्यास सर्वात जास्त राजकीय फायदा कलानी कुटुंबाला होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपाइंतील इतर गट सोबत आल्यास सिंधी, मराठी विभागात आघाडी बाजी मारून सत्ता हस्तगत करील, असा दावा त्यांनी केला.सिंधी समाजाबरोबर आंबेडकरी तसेच उत्तर भारतीय समाजावर आजही कलानी कुटुंबाची जादू आहे. सर्वच्या सर्व ७८ जागांवर महाआघाडीचे उमेदवार उभे करून निवडून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आघाडीत स्थानिक साई पक्षाला घेतल्यास शिवसेना-भाजपाचा धुव्वा उडेल, असे ते म्हणाले.सेक्युलर पक्षांच्या आघाडीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक भाजपा, साई, शिवसेना व ओमी कलानी यांच्या गळाला लागले आहेत. आठपैकी फक्त अंजली साळवे व जया साधवानी या नगरसेवक पक्षासोबत असून पिंकी उदासी व मुरली उदासी यांच्या जातप्रमाणपत्राची पडताळणी सुनावणी सुरू आहे. काही भागांत काँग्रेसची ताकद असली तरी भाजपा व ओमी कलानी एकत्र आल्यास त्या लाटेत कितपत टिकेल, याबाबत पक्षाचे पदाधिकारी साशंकता व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)
उल्हासनगरात युतीला रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष आघाडी
By admin | Published: January 14, 2017 6:16 AM