मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेत ११ वर्षांपासून सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या कंत्राटदाराची राजकीय आशीर्वादाने चालणारी मक्तेदारी कमी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सरकारच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षा रक्षक घेतले आहेत. सध्या २५० पैकी १७० सुरक्षा रक्षक दाखल झाले आहेत, तर पालिकेने सैनिक सिक्युरिटीच्या २०० कर्मचाऱ्यांना कमी केले आहे.
वास्तविक २०१० मध्येच राज्य सरकारने अधिसूचना काढून सरकार तसेच सरकारच्या अखत्यारितील सर्व सार्वजनिक संस्था आदींना या महामंडळाकडून सुरक्षा व्यवस्था घेणे बंधनकारक केले होते. असे असताना मीरा-भाईंदर महापालिकेने मात्र खासगी सैनिक सिक्युरिटीचे सुरक्षा रक्षक घेतले. २००९ मध्ये पहिल्यांदा कंत्राट दिल्यानंतर २०१५ मध्ये सैनिक सिक्युरिटीला पुन्हा कंत्राट दिले. २०१८ मध्ये मुदत संपूनही मुदतवाढीवर कंत्राट ठेका सुरू आहे. कार्यदेश देताना ५११ सुरक्षा रक्षक पुरवण्याचे नमूद होते; पण नंतर तीच संख्या वाढत जाऊन ९८२ वर पोहोचली.
काही नगरसेवक, नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण वरदहस्त असल्याने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षा रक्षक घेण्यास टाळाटाळ केली गेली. त्यातच सुरक्षा रक्षक पुरवण्यात व प्रत्यक्ष कामावर हजर सुरक्षा रक्षक यातील तफावत, पालिकेकडून घेतल्या जाणाऱ्या वेतन रकमेपेक्षा सुरक्षा रक्षक यांना मात्र कमी मिळणारे वेतनापासून अनेक तक्रारी, आरोप हे सैनिक सिक्युरिटीसह पालिकेवर होत आले आहेत.
-----------------------------------
पोलिसांप्रमाणे दिले जाते प्रशिक्षण
पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी पालिका रुग्णालय, कोविड उपचार केंद्र, महापालिका मुख्यालय आदी ठिकाणी सक्षम सुरक्षा रक्षकांची आवश्यकता पाहून १५ जूनपासून महामंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. २५० सुरक्षा रक्षकांची मागणी केली असून, १७० रक्षक सेवेत दाखल झाले आहेत. या सुरक्षा रक्षकांना पोलिसांसारखे प्रशिक्षण दिले जाते. पोलिसांसारखे काही अधिकार आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षक म्हणून ते प्रभावी काम करू शकतील, असे सांगितले जाते.