डोंबिवली : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु, सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरणाऱ्या या कॅमेऱ्यांचीच सुरक्षा धोक्यात आली आहे. बदलापूर पाईपलाईन रोडवरील कोळेगाव चौकात लावलेला ४० हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही कॅमेराच चोरून नेण्यात आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कंट्रोल रूम केडीएमसीच्या मुख्यालयात आहे. मनपा हद्दीत २२० महत्त्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यासाठी ७१ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. या सीसीटीव्हींमुळे अंतर्गत रस्त्यावर घडणारा अपघात, गुन्हा, वाहतूककोंडीवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. शहरात सोनसाखळी, वाहनचोरीचे गुन्हे वाढले असताना गुन्ह्यांची उकल करण्यासाठी या कॅमेऱ्यांचीही पोलिसांना विशेष मदत होत आहे. परंतु, शहरातील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीच सुरक्षा आता धोक्यात आली आहे.
बदलापूर पाईपलाईन रोडवरील कोळेगाव चौकात रस्त्याच्या दुभाजकावरील लोखंडी पोलवर २९ सप्टेंबर २०२० ला सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला होता. परंतु, तो कॅमेरा चोरीला गेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. कॅमेऱ्याची किंमत ४० हजार रुपये आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
------------------