ठाणे : बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आता त्यांच्यासह घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानीही पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आला आहे. सध्या एकनाथ शिंदे इतर बंडखोर आमदारांसह गोव्यातील ताज हॉटेलमध्ये आहेत. तेथे त्यांची बैठक सुरु असून सायंकाळपर्यंत सर्व बंडखोर आमदारांसह शिंदे मुंबईत परतण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे निवासस्थानी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, विशेष शाखा उपायुक्त सुधाकर पठारे, झोन ५ चे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, वाहतूक विभागाचे उपायुक्त दत्ता कांबळे या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा आज आढावा घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान अतिमहत्वाचे ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद गाठले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या कारभारास सुरुवात केली. दरम्यान शिंदे यांच्या निवासस्थान आणि परिसरात सुशोभिकरण आणि अन्य सोयी-सुविधांसाठी पालिका कर्मचारी अधिका-यांनी धाव घेतली आहे. मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून शिंदे हे सक्रीय झाले असून त्यांच्या बंडाला साथ देणारे अनेक सहकारी अद्यापही मुंबईबाहेर गोव्यामध्ये आहे. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन त्यांना मुंबईत आणण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांनी देखील कंबर कसली आहे. त्यांनी शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. ठाणे पोलीस आयुक्त आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराचा आढावा घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात करण्यात येणार आहे. तसेच या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर लवकरच बॅरिकेट्स लावण्यात येतील. सर्व एन्ट्री पॉईंट बंद करण्यात येतील. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवण्यात येणार आहे. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.