भिवंडी : भिवंडी-ठाणे या शहरांना जोडणाऱ्या उल्हास नदीवरील कशेळी खाडी येथे बीओटी तत्त्वावर दोन स्वतंत्र मार्गिका बनवून पूल बांधण्यात आला आहे. मात्र, या पुलाची सुरक्षा रामभरोसे असल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देत नाराजी व्यक्त केली आहे.
या पुलावरील संरक्षक कठडे कमी उंचीचे असल्याने या पुलावरून आत्महत्या करण्याच्या घटना नेहमी घडतात. त्यासाठी या पुलावरील संरक्षक कठड्यांची उंची वाढविणे, पुलावर पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे असून त्याची पूर्तता करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. या पुलाचे बांधकाम करताना त्यामध्ये अंतर्भाव नसतानाही भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने जाणाºया मार्गिकेवरील पुलावर भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पाइपलाइनचे काम केले असल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे. वाढलेला भार हा पुलाचे जीवनमान कमी करणार असतानाच या पाइपलाइनला अपघात झाल्यास पूल उद्ध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे ही पाइपलाइन काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.