डोंबिवली : केडीएमटी उपक्रमाचे प्रमुख संचलन चालणाऱ्या गणेशघाट आगारातील संरक्षक भिंती कोसळल्यामुळे तेथील सुरक्षा धोक्यात आली असताना वसंत व्हॅलीतील स्व. बाळासाहेब ठाकरे आगार आणि डोंबिवलीतील खंबाळपाडा आगाराची स्थिती फारशी वेगळी नाही. या आगारांकडे पूर्णत: कानाडोळा झाल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. सातत्याने चोरीच्या घटना घडूनही तेथे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सुविधांअभावी सुरक्षा राखायची तरी कशी, असा प्रश्न तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
खंबाळपाडा परिसरात केडीएमटीच्या आगारासाठी आरक्षित जागा आहे. तेथे केडीएमटीच्या बस उभ्या करण्याचे आणि डिझेल पंप उभारण्याचे प्रस्तावित होते. डोंबिवलीतील बसचे संचलन या आगारातून करण्याचे नियोजनही करण्याचे ठरविण्यात आले होते; परंतु या जागेवर काही वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मोठ्या आरसी आणि घंटागाड्या, अशा २०० हून अधिक कचऱ्याच्या गाड्या उभ्या केल्या जात आहेत. कल्याण पूर्वेतील तीन प्रभागांमध्ये कचरा उचलणाऱ्या, डोंबिवलीच्या चार प्रभागांसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या येथे उभ्या केल्या जातात.
दरम्यान, आगारात पुरेसे विद्युत दिवे नाहीत. प्रवेशद्वारावरच केवळ बल्ब लावला आहे. त्यात आगारातील बहुतांश ठिकाणी संरक्षक भिंती पडल्याने सुरक्षा राखणे येथील सुरक्षारक्षकांना जिकिरीचे होऊन बसते. याठिकाणी प्रसाधनगृहांची सुविधा नसल्याने सुरक्षारक्षकांसह कचऱ्याच्या गाड्यांवरील चालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कार्यशाळेसाठीदेखील सुसज्ज कार्यालय नसल्याने उघड्यावर गाड्या दुरुस्त कराव्या लागत आहेत. पावसाळ्यात दुरुस्तीचे काम करताना तारेवरची कसरत कामगारांना करावी लागत आहे.
------------------------------------------------
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आगाराचीही दुरवस्था
कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आगाराकडेही प्रशासनाकडे दुर्लक्ष झाल्याने आगार दुरवस्थेच्या गर्तेत सापडले आहे. परिवहन उपक्रमात बस वाढत असताना या आगारातून बसचे संचलन व्हावे, यासाठी हा आगार बांधण्यात आला; परंतु मूळ उद्देशाचा प्रशासनाला विसर पडला आहे. याठिकाणी भंगार अवस्थेतील बस उभ्या करण्यात आल्या आहेत, तसेच आगारात रानही मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यात सापांचा वावर वाढल्याने येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
-----------------------