हितेन नाईक, पालघरतारापूर एमआयडीसीच्या नवापूर गावातून नेण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांना नोकरी-पैशाची प्रलोभने दाखवून चुकीच्या पद्धतीने करारनामे काही लोकांकडून लिहून घेण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र काही जागृत शेतकऱ्यांनी आजही हया प्रलोभनला बळी न पडता हा डाव उधळूण लाऊन आपल्या शेतातून पाइपलाइन टाकण्यास मज्जाव केला आहे.तारापुरच्या औद्योगिक वसाहती मधील कारखान्या मधून बाहेर निघणारे प्रदूषित सांडपाणी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (सीईटीपी) पाठवले जाते. तेथून हे प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करुन ते नवापूर मधून गेलेल्या पाइपलाइन मधून थेट नवापुर-अलेवाडीच्या समुद्रात ४० वर्षापूर्वीपासून सोडले जात होते. ही पाइपलाइन जिर्ण आणि नादुरुस्त झाल्याने या पाइपलाइन मधून निघणारे प्रदूषित सांडपाणी नवापूर, पाम इ.भागातील शेतात, बागायती क्षेत्रात शिरुन हे क्षेत्र नापिक बनले आहे. त्या मुळे मागील १५-२० वर्षापासून इथल्या शेतकऱ्यानी भात पीक ,भाजीपाला पिक घेणे बंद केले आहे. त्या मुळे अनेकांना आपल्या जमीनी कवडी मोल दराने विकण्याशिवाय गत्यंतर उरले नव्हते. १५ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री १०.३० च्या दरम्यान प्रदूषित पाण्याची पाइपलाइन फुटून लाखो लीटर सांडपाणी अनिल मेहेर इ.सह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात, विहिरित घूसले होते. या संदर्भात एमआयडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आल्या नंतर १९ सप्टेंबरला ४ दिवस उशिराने प्रदुषण मंडळाचे अधिकारी पंचनामे करण्यासाठी मेहेर यांच्या बागायतीत पोहचले. त्यावेळी कुणीही पंच न सापडल्याचे कारण देऊन अधिकारी निघून गेले. त्या नंतर २४ सप्टेंबर रोजी म्हणजे १० दिवसांनी या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. परंतु मधल्या काळात मुसळधार पाऊस पडल्याने बागायती क्षेत्रासह विहिरित गेलेल्या प्रदूषित पाण्याची तीव्रता कमी झाली होती. त्याच पाण्याचे सॅम्पल प्रदुषण मंडळाने नेल्याने येणारा रिपोर्ट हा एमआयडीसी आणि प्रदुषण मंडळाच्या बाजूने येऊन प्रदूषणाची तीव्रता कमी असल्याची नोंद येणार आहे. त्यामुळे हेतु पुरस्कर मुद्दाम पंचनामा उशिरा करण्यात आल्याचा आरोप मेहेर यांनी केला आहे. याघटने मुळे मेहेर यांच्या बागायती मधील ७९ नारळ झाडे, २४ आंबा, ४१ केळी, २१ फणस अशी सुमारे २८४ झाडांच्या मुळाशी प्रदूषित पानी शिरून झाडे मरणावस्थेत पोहोचली आहेत. ६ महिने उलटून ही त्याना कुठलाही नुकसान भरपाई मिळालेली नाही.
सांडपाण्याच्या पाईपलाईनसाठी प्रलोभने
By admin | Published: March 08, 2016 1:41 AM