लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : लहान मुलीच्या हातात मोबाइल बघितला आणि प्रवाशाची नियत फिरली. मोबाइल हिसकावून तो तरुण घरी गेला. मात्र, सीसीटीव्हीने त्याचे बिंग फोडले असून, आदर्श कुमार याला अवघ्या पाच तासांत कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेला मोबाइलही हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे आदर्श हा कामासाठी पहिल्यांदाच मुंबईला आला. मात्र, चाेरीमुळे त्याची रवानगी जेलमध्ये झाली आहे.
बिहारहून रविवारी आलेल्या पवन एक्स्प्रेसमधून शबनम खातून ही महिला दोन मुले व मुलीसह प्रवास करीत होती. शबनम ही आपल्या जागेवर झोपली होती. तिने तिचा मोबाइल मुलीकडे दिला होता. मात्र, तिला जाग आली तेव्हा मुलीकडे मोबाइल नव्हता. तोपर्यंत गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचली होती. त्यामुळे तिने पुन्हा कल्याण गाठून लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. शबनमचा चोरीस गेलेला मोबाइल सुरू होता. गाडीतील सहप्रवाशाने तो चोरल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे त्यांनी स्थानकातील सीसीटीव्हींचे फूटेज तपासले असता संशयित चोरटा दिसला.
प्रथमच आला होता मुंबईत
कल्याण जीआरपीचे पोलीस निरीक्षक पंढरी कांबे म्हणाले, सीसीटीव्ही आणि तांत्रिक पद्धतीने आम्ही तपास सुरू केला. शबनमचा फोन सुरूच होता. तिच्या मोबाइलवर फोन केला तेव्हा तो आदर्श या सहप्रवाशाने चोरल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले. आदर्श हा बिहारचा समस्तीपूरचा रहिवासी असून, तो कामानिमित्त प्रथमच मुंबईला आला होता. मोबाइल पाहून त्याची नियत फिरली. आता त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे.
-----------------------------