उल्हासनगर : गेल्या ९ महिन्यापासून रिक्त असलेल्या राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षपदी सीमा आहुजा यांची पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नियुक्ती केली. यापूर्वीच्या महिला अध्यक्षांनी कलानीच्या नेतृत्वाखाली काम करणार नसल्याचे सांगून पदाचा राजीनामा दिल्याचे उघड झाले असून पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगर राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षपदी पंचम कलानी यांची नियुक्ती झाल्यावर, पक्षाची ताकद वाढली. दरम्यान पक्षात कलानी व गंगोत्री असे सरळसरळ दोन गट निर्माण झाले आहे. दोन्ही गट एकमेकांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार नसल्याचे अनेकदा उघड झाले आहे. पक्षाच्या तत्कालीन शहरजिल्हाध्यक्षा सोनिया कौर धामी यांची प्रदेश महासचिव पदी नियुक्ती करून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले.
दरम्यान पक्षाच्या महिला शहराध्यक्षा रेखा हिरा यांनी थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांना १२ जून २०२२ रोजी पत्र पाठवून शहराध्यक्षा पंचम कलानी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास नकार देऊन, महिला शहरजिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेंव्हा पासून महिला शहराध्यक्ष पद रिक्त होते. सोनिया कौर धामी यांच्या प्रमाणे रेखा हिरा यांची प्रदेश संघटन सचिव पदी नियुक्ती करून पक्षाने राजकीय पुनर्वसन केले.
दरम्यान रिक्त असलेल्या राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष पदासाठी पक्षात चढाओढ लागली असतांना, पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते महिला शहराध्यक्ष पदी सीमा आहुजा यांची नियुक्ती केली. त्यामुळे स्पर्धेतील अनेक महिला मध्ये नाराजी पसरल्याचे बोलले जाते. गेल्या महापालिका निवडणुकी वेळी कलानी कुटुंब भाजप सोबत होते. त्यावेळी पक्षाची धुरा भारत गंगोत्री यांच्याकडे होती. त्यांनी पक्षाचे ४ नगरसेवक निवडून आणून पक्षाचे अस्तित्व शहरात कायम ठेवले. मात्र पक्ष वाढविण्यासाठी पुन्हा कलानी कुटुंब राष्ट्रवादीमय होऊन शहरजिल्हाध्यक्षपदी पंचम कलानी यांची निवड झाली. तेंव्हा पासून शहरात राष्ट्रवादी पक्षाच्या ताकदीत वाढ झाल्याचे बोलले जाते. मात्र पक्ष दोन गटात विभागल्याने, पक्षाचे वाद ऐन निवडणुकीत चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली.
राष्ट्रवादी एकसंघ...पंचम कलानी महिला शहराध्यक्ष पदी सीमा आहुजा यांची नियुक्ती झाल्यावर, यापूर्वीच्या महिला शहराध्यक्षा रेखा हिरा यांची पक्षाने हक्कालपट्टी केल्याची चर्चा शहरात रंगली होती. रेखा हिरा या प्रदेश कमिटीवर असल्याची माहिती शहरजिल्हाध्यक्षा पंचम कलानी यांनी देऊन, पक्ष एकसंघ असल्याचे त्या म्हणाल्या.