ठाणे - ठाणे महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने करवसुलीची मोहीम तीव्र केली आहे. यंदा टीकेचे धनी ठरलेली बॅण्डबाजा बारात नाही; मात्र वसुलीसाठी इतर उपाययोजना पालिकेने केल्या आहेत. त्यानुसार, ४१० कोटींचे लक्ष्य या विभागाने पार केले आहे. ते पार करण्यासाठी १४०० मालमत्ता जप्त केल्या असून १२०० व्यावसायिक मालमत्ता सील केल्या आहेत. विशेष म्हणजे जप्त केलेल्या आणि सील केलेल्या मालमत्तांमध्ये दोन हजारांच्या आसपास मालमत्ता मुंब्रा आणि दिव्यातील आहेत. येथील वसुली वाढवण्यासाठी पालिकेचे विविध प्रयत्न आजही सुरू आहेत.ठाणे महापालिकेने २०१८-१९ या आर्थिक वर्षात ज्या मालमत्ताधारकांनी कराची रक्कम महापालिकेकडे जमा केलेली नाही, अशांच्या मालमत्तांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार, ठाणे महापालिका प्रभागनिहाय ही कारवाई करत आहे. नागरिकांना मालमत्ताकर जमा करणे सोयीचे व्हावे, या दृष्टिकोनातून १ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत महापालिकेची सर्व करसंकलन केंदे्र सार्वजनिक सुटीच्या दिवशी (२१ मार्च २०१९ वगळून) पूर्णवेळ तसेच सर्व रविवारी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.मोठ्या थकबाकीदारांना मोकळे रानमहापालिकेने आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून डिसेंबर महिन्यापासूनच थकीत मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई सुरूकेली आहे. त्यानुसार, आतापर्यंत १४०० मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत १० कोटींच्या घरात आहे, तर १२०० मालमत्ता सील केल्या असून त्यांची किंमत अंदाजे नऊ कोटींच्या घरात आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये एक हजारांच्या आसपास मालमत्ता या दिवा आणि मुंब्य्राच्या आहेत, तर सील करण्यात आलेल्या मालमत्तांमध्येसुद्धा एक हजारांच्या आसपास मालमत्ता याच भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. १४०० मालमत्तांची किंमत अवघी १० कोटी, म्हणजेच ७१ हजार असल्याने पालिकेने गरिबांवरच कारवाई केल्याचे स्पष्ट होत असून मोठ्यांना मात्र रान मोकळे ठेवल्याची चर्चा आहे.३०० नळजोडण्या खंडित : पाणीबिलाची वसुली करताना आतापर्यंत ३०० नळजोडण्या खंडित केल्या असून त्यांच्याकडे तीन कोटी ७५ लाखांची थकबाकी होती.
थकबाकीदारांच्या १४०० मालमत्ता जप्त, १२०० मालमत्ता सील; ठामपाची कठोर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 2:55 AM