भिवंडी - म्हापोली गावाजवळील काजूबांधनपाडा येथे ३६ हजार रूपयांचे ३६० किलो गोमांस गणेशपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास जप्त केले. राज्य शासनाने शेती उपयुक्त व प्रजननक्षम गाय, बैल आदी जनावरांची कत्तल करण्यास बंदी केली असताना काही गोमांस विक्रेते ग्रामीण भागात कत्तल करून गोमांस विक्री करीत आहेत. याचा शोध घेत असलेल्या पोलिसांना कारमधून गोमांस विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे आज पहाटे काजूबांधन पाडा येथे पोलिसांनी सापळा लावला असता तेथे गोमांसाने भरलेली कार आली. परंतु पोलीस येत असल्याची माहिती मिळताच कारमधील आरोपी जागेवर कार व कारमधील गोमांस सोडून फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळी कारसह ३६ हजार रूपयांचे ३६० किलो गोमांस जप्त केले. तसेच जप्त केलेल्या कारसह गाय कापण्यास लागणारी हत्यारे कु-हाड,सुरे, लोखंडी हुक व मोबाइल असा एकूण १ लाख ११हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस कार मालक व मोबाइलच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे. काही महिन्यांपूर्वी पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशाचा कत्तलखाना उघडकीस आला होता. तेव्हापासून ग्रामीण भागात चोरीछूपे अडगळीच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी कत्तल करून गोवंशाचे मांस ठिकठिकाणी विकण्यास आणले जात आहे.