ठाणे : ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेच्या विद्यार्थिनींनी अॅनिमियावर मात करणारे औषधी चॉकेलेटचे संशोधन केले असून चीनमधील मकाऊ येथे होणाऱ्या ३४ व्या ‘किशोरवयीन विज्ञान व तंत्रज्ञान नवपरिवर्तन’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाºया विज्ञान स्पर्धेत शाळेच्या या विज्ञान प्रकल्पाची निवड झाली आहे. ‘अॅनिमिया आजारावर नियंत्रण’ हा या प्रकल्पाचा विषय असून २१ ते २६ जुलैदरम्यान ही स्पर्धा होणार आहे.प्रज्ञा मोरे व सेजल रांगळे या विद्यार्थिनींनी या विषयाचा संशोधनात्मक अभ्यास केला आहे. या प्रकल्पास शिक्षिका उज्ज्वला धोत्रे व अभिजित जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. २० जुलै रोजी रात्री ११ वाजता शिक्षिका धोत्रे व विद्यार्थिनी प्रज्ञा या चीनला रवाना होत आहेत. या विद्यार्थिनींनी केलेल्या अभ्यासात असे आढळले की, भारतात तसेच संपूर्ण जगात लहान मुले, स्त्रिया, गरोदर स्त्रिया यांच्यात अॅनिमियाचे प्रमाण जास्त असते. त्यावर गोळ्या, कॅप्सुल्स, इंजेक्शन या स्वरूपात औषधे उपलब्ध आहेत. तसेच, काही अन्नघटकांतूनसुद्धा लोह शरीरास पुरवले जाते. परंतु, काही अन्नपदार्थांची अॅलर्जी, खर्चिक बाब यामुळे लोक दुर्लक्ष करतात व अॅनिमियाचे प्रमाण वाढते. विद्यार्थिनींच्या संशोधनातून अशी माहिती मिळाली की, स्पिरुलीना अॅलर्जीमध्ये लोह व प्रथिनांची मात्र जास्त प्रमाणात आहे. परंतु रंग, वास, चव यामुळे ती प्रत्यक्ष खाल्ली जात नाही, म्हणून विद्यार्थिनींनी सर्व वयोगटांना आवडेल, असे स्पिरुलीनामिश्रित चॉकलेट्स तयार केले. त्याची तपासणी एन्व्हायरोकेअर लॅबमध्ये केली असता लोह व इतर पोषक मूल्यांचे प्रमाण अधिक आढळले, असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.>भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करणाºया दोन विज्ञान प्रकल्पांमध्ये आमच्या मराठी माध्यमाच्या एका विज्ञान प्रकल्पाचा सहभाग आहे. याचा मुख्याध्यापक म्हणून मला अभिमान आहे.- प्रकाश पांचाळ, मुख्याध्यापक
अॅनिमियावर शोधले औषधी चॉकलेट, चीनमधील विज्ञान प्रदर्शनात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 1:13 AM