ठाणे : निखिल ढाकेची दुबई येथे २४ ते २७ एप्रिल २०२४ या कालावधीत होणाऱ्या आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. ठाणे महापालिका प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणारा निखिल ढाके हा एकमेव ठाणे जिल्हाचा एकमेव क्रीडापटू आहे.
दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये तो सरावाचे प्रशिक्षण घेत आहे. ज्युनियर फेडरेशन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर निखिलची निवड करण्यात आली. निखिल म्हणाला, “मला पाठिंबा दिल्याबद्दल मी माझ्या पालकांचा खूप आभारी आहे. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी मी खूप उत्सुक आहे. ही माझी पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे आणि मी माझे सर्वोत्तम देईन. यामुळे मला आगामी काळात आणखी कठोर परिश्रम करण्यासाठी खूप प्रेरणा मिळाली आहे." त्याचे प्रशिक्षक नीलेश पाटकर म्हणाले की, “निखिल हा प्रतिभावान खेळाडू आहे. तो माझ्याकडे दादोजी कोनदेव स्टेडियममध्ये सुमारे दोन वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहे. तो खूप मेहनती खेळाडू आहे.
माझा नेहमीच नवशिक्यांसोबत काम करण्यावर विश्वास होता. हे त्याचे आणखी एक परिपूर्ण उदाहरण आहे. जर तुम्ही तुमच्या प्रशिक्षकावर विश्वास ठेवला आणि तुमच्या मनात कोणतीही शंका न ठेवता फक्त त्याच्या सूचनांचे पालन केले तर यशाचे प्रमाण जास्त असेल. श्रद्धा घुले, प्रणव देसाई, निधी सिंग आणि आता निखिल भारताचे प्रतिनिधित्व करणारा माझा चौथा खेळाडू आहे. मला असे वाटते की ठाणे शहरात एक ऍथलेटिक ट्रॅक मिळाल्यास आपल्याकडे भारताचे प्रतिनिधित्व करणारे अनेक ऍथलीट होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.