ठाणे: राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उद्यान पंडित पुरस्कारासाठी शहापूर तालुक्यातील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांची निवड करण्यात आली आहे. काेराेना महामारीमुळे २०२० पासून कृषी विभागाचे हे पुरस्कार रखडले होते. यंदापासून या पुरस्कारांचे वितरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यास अनुसरून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे उघड झाले. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत लवकरच त्यांना या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. दोन लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शहापूरच्या अतिदुर्गम अशा डोळखांब भागात हरणे यांनी फुलशेती, वनशेतीसह चंदन लागवड, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, गांडूळखत निर्मिती, भाजीपाला लागवड, केळी लागवड, फळबाग लागवड, मल्चिंग वापर, ठिबकचा वापर, पशुपालक व शेतकरी मार्गदर्शन मेळावे, शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार, आंबा फळपीक नर्सरी, शेळीपालन सौरऊर्जेचा वापर, पाणीबचत शेती, भातपीक स्पर्धा, विद्यार्थ्यांना शेती व भाजीपाला, फळबाग लागवडीबाबत मार्गदर्शन, गोबर गॅसचा वापर, फळपीक कलम लागवड प्रशिक्षण, यांत्रिक शेती, सेंद्रिय शेती आदी उपक्रम राबविले आहेत. या विविध उपक्रमांची दखल घेऊन त्यांना हा उद्यान पंडित पुरस्कार देऊन प्राेत्साहित करण्यात आले आहे. त्यांना राज्यपालांच्या हस्ते लवकरच समारंभ पूर्वक हा पुरस्कार देऊन गाैरवण्यात येणार, असल्याचे हरणे यांनी लाेकमतला सांगितले.