ठाणे : शिवसेना आणि भाजपमध्ये अद्यापही काही मुद्यावरून युतीची चर्चा लांबत असल्याने भाजपपाठोपाठ आता शिवसेनेनेही स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. यानुसार ठाणे, ओवळा - माजिवडा, कळवा-मुंब्रा, कल्याण ग्रामीण चार मतदारसंघातून अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी भाऊगर्दी केली आहे. यात कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मात्र एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. असे असले तरी दुसरीकडे ओवळा-माजिवडा मतदारसंघातून प्रताप सरनाईकांच्या विरोधात काहींनी मुलाखती दिल्याने येथे कडवे आव्हान उभे राहणार असल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी मीरा-भार्इंदरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला होता. त्यानंतर आता ठाणे महापालिकेतही शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला आहे. सत्ताधारी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी ठाण्यात भाजप सोडतांना दिसत नाही. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी जेव्हा उमेदवारांची चाचपणी झाली तेव्हा भाजपच्या वतीने सर्वच मतदार संघातून इच्छुकांनी मुलाखती दिल्या. आजही महासभा तहकूब करण्यामागे सत्ताधारी शिवसेना असल्याचा आरोप भाजपने केला आहे.एकूणच मागील काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगत असतांना स्थानिकांना युती नको आहे, अशी काहीशी भावनाही तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे आता शिवसेनेच्या वतीने शिवसेना भवन येथे गुरुवारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील इच्छुकांच्याही मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये ठाण्यातील तीन मतदारसंघातून अनेक इच्छुकांची नावे पुढे आली आहेत. ओवळा माजिवड्यात सरनाईकांना स्वकियांचे कडवे आव्हान मागील काही काळापासून प्रताप सरनाईक विरुद्ध काही नगरसेवक असा संघर्ष शिगेला पोहचल्याचे दिसून आले आहे.
महासभेतही काही प्रस्तावांवरुन सरनाईक विरोधातील नगरसेवकांनी आवाज उठविला होता. आता हा संघर्ष उमेदवारीपर्यंत येऊन पोहचला आहे. त्यामुळेच त्यांना आव्हान देण्यासाठी आता महापौर मीनाक्षी शिंदे, गटनेते दिलीप बारटक्के, नरेश मणेरा आदींनी उमेदवारी मिळावी यासाठी तयारी सुरू केली आहे.
कळवा मुंब्य्रात शिवसेनेकडून तीनच नावे पुढेकळवा - मुंब्रा मतदारसंघातून शिवसेनेतून तगडे इच्छुक पुढे येतील, अशी आशा होती. मात्र, या मतदारसंघातून केवळ तीनच नावे पुढे आले असून यामध्ये माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, सुधीर भगत आणि प्रदीप जंगम या नावांचा समावेश आहे. एकूणच शिवसेनेने राष्टÑवादीचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी ही लढत सोपी केल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
ठाणे मतदार संघ खेचण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्नठाणे शहर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले आणि भाजपने हा बालेकिल्ला आपल्याकडे खेचून घेतला. परंतु, हा बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यासह, मागील निवडणुकीत संजय केळकर यांच्यासमोर पराभूत झालेले रवींद्र फाटक, संजय भोईर आदींनीदेखील मुलाखती दिल्या आहेत.कोपरी पाचपाखाडीत शिंदेचाच बोलबालातीन मतदारसंघातून अनेक इच्छुकांची नावे पुढे आली असली तरी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मात्र इच्छुकांमध्ये एकही नावे पुढे आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येथील उमेदवार ही एकनाथ शिंदेच असतील हे स्पष्ट झाले आहे. किंबहुना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ हा आता त्यांचाच बालेकिल्ला मानला जात आहे.
कल्याण ग्रामीणमध्येही भोईरांना स्वकियांचे आव्हानकल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील अनेकांनी आव्हान उभे करून त्यांच्या नावाला विरोध केला आहे. त्यामुळेच या मतदारसंघातून रमेश म्हात्रे, राजेश मोरे, दीपेश म्हात्रे, ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी आदींनी मुलाखती देऊन कडवे आव्हान उभे केले आहे.