कल्याण : लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान झालेल्या फेरीवाल्यांना पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेंतर्गत १० हजार रुपये कर्जस्वरूपात दिले जाणार आहेत. कल्याण-डोंबिवलीत यासाठी अर्ज नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. यासंदर्भात केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत अर्जाची नोंदणी कशी करायची, याबाबते मार्गदर्शन केले.केडीएमसी हद्दीत आठ हजार ८२३ नोंदणीकृत फेरीवाले आहेत. मात्र, आत्मनिर्भर योजनेचा लाभ नोंदणीकृत तसेच नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांनाही मिळणार आहे. परंतु, त्यासाठी शहर फेरीवाला समिती, स्थानिक प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांची शिफारस लागणार आहे. अर्ज नोंदणी प्रक्रिया तसेच या योजनेबाबत माहिती देण्यासाठी डोंबिवली विभागीय कार्यालयात बैठक झाली. यावेळी सहायक आयुक्त सुहास गुप्ते, ‘फ’ प्रभाग अधिकारी राजेश सावंत, ‘ग’ प्रभाग अधिकारी स्नेहा करपे, ‘ह’ प्रभाग अधिकारी भरत पवार, फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी, सायबर कॅफे आणि आधारकार्ड नोंदणी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अर्ज नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, अर्ज आॅनलाइन कसा भरायचा? बँकेचे पासबुक, मतदार ओळखपत्र, संघटनेचा सदस्य असल्याचे पत्र ही कागदपत्रे कशी जोडावीत तसेच लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी तो फेरीवाला असावा आदी सूचना यावेळी करण्यात आल्या. अर्ज नोंदणीसाठी सायबर कॅफेचालकांसह आधारकार्ड नोंदणी करणाऱ्यांचेही महापालिका सहकार्य घेणार आहे. त्यांनाही सुरक्षिततेच्यादृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.
आत्मनिर्भर योजना : फेरीवाल्यांना मिळणार १० हजारांचे कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 2:01 AM