डोंबिवली: रस्त्यावर वाहतूक नियमन करताना पोलिसांना येणारा मानसिक ताण, नागरिकांशी सौजन्याने वागण्यासाठी स्वतःमध्ये संयम असणे कसे आवश्यक आहे याबाबत सोमवारी शुभम हॉल, डोंबिवली पुर्व येथे रोटरी क्लब सनसिटी व डोंबिवली वाहतूक उप विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण वाहतूक विभागातील वाहतूक पोलिसांकरिता वाहतूक पोलीसांना येणारा मानसिक ताण तणाव आणि त्यावरील उपाययोजन या विषयावर प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ.अद्वैत पाध्ये यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
त्या व्याख्यानामध्ये पाध्ये यांनी प्राणायाम, व्यायाम, ध्यानधारणा करण्यावर पोलिसांनी भर द्यावा असे आवाहन केले. वाहतूक पोलिसांना सतत प्रदूषनाला सामोरे जावे लागत असल्याने श्वसन विकार, खोकला, दमा होऊ शकतो.त्यासाठी त्यांनी वेळेत व नियमित आहार घेणे, भरपूर पाणी पिणे, तोंडावर मास्क लावणे आदी उपाय करायला हवेत असेही सांगण्यात आले.
त्यावेळी कल्याण वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त मंदार धर्माधिकारी, कल्याण वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने, डोंबिवली वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते तसेच कल्याण, डोंबिवली व कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे अधिकारी, अंमलदार व वॉर्डन उपस्थित होते.