लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : पुण्यातील भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक या आजारी असताना त्यांना पक्षाने मतदानाला येण्यास भाग पाडले, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. त्याचा समाचार घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही आमच्या आमदाराला मतदानाला बोलावले तर पवार यांना काय प्रॉब्लेम होतो, त्यांच्या पक्षासारखे स्वार्थी नेते आमच्याकडे नाहीत. उलटपक्षी पक्षनिष्ठा, प्रेम, आपुलकी बाळगणारे नेते, कार्यकर्ते आमच्याकडे आहेत, याचा आम्हाला आनंद आहे, असा टोला लगावला.
बीबीएन ग्लोबल असोसिएशनच्या माध्यमातून डोंबिवलीत भरलेल्या सातव्या जागतिक परिषदेच्या समारोपप्रसंगी फडणवीस आले होते. फडणवीस यांनी नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह काही उद्योजकांना ‘उदयोन्मुख पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. फडणवीस म्हणाले की, मी देखील ब्राह्मण समाजाचा असून, समाजाच्या उन्नतीसाठी जे-जे काही करता येईल ते-ते करण्यासाठी प्रयत्न करेन. तसेच काहीही समस्या असेल तर अर्ध्या रात्री मी आवर्जून धाऊन येईन. अशा संस्था टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत. जमेल ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, विवेक वामोरकर, अरविंद कोऱ्हाळकर, आ. गणपत गायकवाड, आ. कुमार आयलानी, माजी आ. नरेंद्र पवार, महापालिकेचे माजी सभापती राहुल दामले, कल्याण भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आदी उपस्थित होते.ब्राह्मण समाजातील उद्योजकांनी एकत्र येऊन व्यवसायाची देवाण-घेवाण करणे, या उद्देशाने रविवारपासून ही परिषद भरविली असून, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आरबीआयचे संचालक सतीश मराठे आदींची उपस्थिती होती. व्यावसायिक नेटवर्किंगद्वारे व्यवसाय वाढीची संधी मिळणार असल्याचे श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले. ‘परिवर्तन २०२३’ या संकल्पनेचे शुक्ल यजुर्वेदीय माध्यदिन ब्राह्मण सभेचे अध्यक्ष प्रदीप जोशी यांनी महत्त्व सांगितले.