ठाणे : शिधापत्रिकेवर विक्री होणाऱ्या धान्याची काळ्या बाजारात विक्री करणाºया सविता नेहरकर हिच्यासह समर्थ को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स सेंट्रल स्टोअर्स लि.च्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. शिधावाटप निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये हा सुमारे दीड लाख रुपयांचा घोटाळा उघड झाल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नेहरकर या विक्रेत्या महिलेने संबंधित समर्थ स्टोअर्सच्या पदाधिकाºयांशी संगनमत करून शिधापत्रिकेवर वितरित करण्याच्या शिधाजिन्नस शिधापत्रिकाधारकांना देण्याऐवजी काळ्या बाजारात विक्रीसाठी साठा केला होता. हा प्रकार ३ जून रोजी शिधावाटप निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये आढळून आला. यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीय प्रणालीस संलग्न असलेल्या ई-पॉस मशीनद्वारे मे २०१९ मध्ये खासगी व्यक्तीच्या मदतीने छेडछाड करून शिधाजिन्नसांची विक्री झाल्याचे दर्शवण्यात आले होते. दुकानाचे शिधावाटप निरीक्षकाच्या आधार क्रमांकाच्या ठिकाणी दुसºयाच व्यक्तीच्या आधार क्रमांकाची नोंदणी केली. त्यानंतर, बनावट रूट नॉमिनीद्वारे व्यवहार करून शिधाजिन्नसांचा अपहार केल्याचेही समोर आले आहे. यावरून, संबंधित आरोपी नेहरकर या महिलेने अधिकृत शिधावाटप दुकान क्र. ३६ फ /५५ चे प्राधिकारपत्रधारक संस्थेचे पदाधिकारी यांनी अल्प उत्पन्न गटातील शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काच्या शासन नियंत्रित दराच्या शिधाजिन्नसापासून वंचित ठेवून जनतेची तसेच शासनाची फसवणूक केल्याचेही आढळून आले आहे. हा प्रकार मे २०१९ ते ३ जून २०१९ या कालावधीत नौपाड्यातील जयानंद सोसायटीतील समर्थ को-ऑप. कन्झ्युमर्स सेंट्रल स्टोअर्स लि. या दुकानामध्ये घडला.
याप्रकरणी नेहरकर या महिलेसह पदाधिकाºयांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.