मराठी माणूस आणि भूमिपुत्र हे मुद्दे घेऊनच आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या आणि त्या जोरावर आपलं अस्तित्व टिकवून असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकदा 'जय मराठी'चा नारा दिला आहे. 'आपलं ठाणे मराठी ठाणे', अशी मोहीम हाती घेत आपलं घर-मालमत्ता मराठी माणसालाच विका, अशी साद मनसेनं घातली आहे.
ठाण्यातील एका सोसायटीत दोन रहिवाशांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हे भांडण गुजराती आणि मराठी व्यक्तीमध्ये झाल्याचं समोर आल्यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला होता.
राहुल पैठणकर आणि हसमुख शहा हे नौपाड्याच्या विष्णुनगर भागातील सुयश सोसायटीत राहतात. इमारतीची लिफ्ट पाचव्या मजल्यावरून सहाव्या मजल्यावर येण्यास विलंब झाल्याने ११ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी, शहा पिता-पुत्राने पैठणकर यांना बेदम मारहाण केली होती.'मराठी-घाटी तुझी नौपाड्यात राहायची लायकी नाही', असं आक्षेपार्ह विधानही त्यांनी केलं होतं. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेच, पण मनसे नेते अविनाश जाधव यांनी हसमुख शहा यांना कान धरून माफी मागायला लावली होती. या माफीनाम्याचा हा व्हिडीओ तुफान हिट झाला आहे. हा प्रतिसाद पाहूनच मनसेनं आपलं हक्काचं 'मराठी' नामक 'ब्रह्मास्त्र' पुन्हा बाहेर काढल्याचं पाहायला मिळतंय.
ठाण्यात काही जणांना मराठी माणसांची जणू अॅलर्जी आहे. मराठी माणूस घर घ्यायला पुढे गेला की समोरची व्यक्ती नकार देते, अशा तक्रारी आमच्याकडे आल्यात. अशावेळी मराठी माणसाने मराठी माणसाला सहकार्य करायला हवं. म्हणूनच मराठीजनांनी आपलं घर किंवा दुकान विकायचं असल्यास मराठी माणसालाच प्राधान्य द्यावं, असं आवाहन ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यानं केलं. ठाण्यातीत काही भागांमध्ये तसे फलकही लावण्यात आले आहेत. या मोहिमेला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावं लागेल.
दरम्यान, विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु, ही निवडणूक आपण लढवायला हवी अशी कार्यकर्त्यांची 'मनसे' इच्छा आहे. त्यासाठीची मोर्चेबांधणी म्हणूनही या मोहिमेकडे पाहता येऊ शकतं.