ठाणे: आॅनलाईन सकेतस्थळांवरुन (साईटवरुन) भाडयाने कार आणि डिजिटल कॅमेरे घेऊन त्यांची परस्पर विक्री करुन करोडो रुपयांचा अपहार आणि फसवणूक करणाऱ्या महेश भोगले याला ठाणेनगर पोलिसांनी शनिवारी महाबळेश्वर येथून अटक केली आहे. त्याच्याकडून तीन वाहने आणि ११ डिजीटल कॅमेरे असा १२ लाख ६५ हजार २९९ रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी गुरुवारी दिली.ठाण्याच्या किसननगर येथील रहिवाशी विशाल सानप यांची भोगले याच्याशी फेसबुकवरुन ओळख झाली होती. त्याआधारे त्याने सानप यांच्याशी गोड बोलून आॅगस्ट २०१८ मध्ये त्यांचा डिएसएलआर कॅमेरा घेऊन गेला. हा कॅमेरा त्याने तो परत न केल्याने याबाबत त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भोगले याने अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केली असून तो हुलकावणी देत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर, निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजित गोंधळी, पोलीस नाईक धनंजय पाटील आणि विक्रम शिंदे आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच खबºयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे महेश भोगले (रा. भोगलेवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) यास महाबळेश्वर येथून २२ डिसेंबर २०१८ रोजी अटक केली. तो संगणक तंत्रज्ञ असून छानछौकीचे जीवन जगण्यासाठी त्याने अशा प्रकारे फसवणूकीचे गुन्हे केल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली. अस्खलीत इंग्रजीची संभाषणकला त्याला अवगत असल्यामुळे त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत असे. कोणाकडूनही वस्तू भाडयाने घेतल्यानंतर तो स्वत:चा मोबाईल क्रमांक तसेच वास्तव्याचे ठिकाणही बदलत असे. त्याने अशाच प्रकारे अनेक जणांकडून डिजीटल कॅमेरे एका संकेतस्थळाशी संपर्क साधून घेतले. भाडयाने घेतलेल्या या वस्तू त्याने परत करण्याऐवजी त्यांची विक्री केल्याचीही कबूली दिली. त्याच्याकडून अशा तीन कार आणि ११ कॅमेरे असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.यापूर्वीही त्याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात २७ लाख ८७ हजारांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातही त्याला अटक झाली होती. याशिवाय, पुण्याच्या स्वारगेट पोलीस ठाण्यातील एका गुन्हयात १० लॅपटॉपची विक्री करुन दोन लाखांची फसवणूक त्याने केली. या गुन्हयातही पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्येही त्याच्याविरुद्ध नऊ जणांनी ५१ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार केलेली आहे. या प्रकरणाचीही चौकशी सुरु आहे. त्याने अशा प्रकारे सामान्य नागरिकाची ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांची सुमारे ९४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही उघड झाले आहे. त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.........................सावधानता बाळगाकोणतीही वस्तू भाडयाने देतांना दक्षता घेण्याचे घ्यावी. तसेच भोगले याच्याविरुद्ध आणखीही कोणाची तक्रार असल्यास त्यांनी ठाणेनगर पोलिसांशी संपर्क साधावा, असेही उपायुक्त स्वामी यांनी केले आहे.
आॅनलाईन साईटवरुन भाडयाने कार घेऊन परस्पर विक्री करुन करोडोंचा अपहार: भामटयाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 5:50 PM
अस्खलित इंग्रजीतील संभाषणाची कला अवगत असलेल्या महेश भोगले या संगणक तंत्रज्ञाने कार आणि डिजिटल कॅमेरे संकेतस्थळावरुन भाडयाने घेऊन अनेकांना करोडोंचा गंडा घातला होता. त्याला आता ठाणेनगर पोलिसांनी महाबळेश्वर येथून अटक केली आहे.
ठळक मुद्दे महाबळेश्वरमध्ये घेतले ताब्यातठाणेनगर पोलिसांची कारवाईपुण्याच्या स्वारगेट पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल