- लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल परिणामी घटत चाललेली पटसंख्या यावर उपाययोजना म्हणून केडीएमसीच्या शाळांमध्येही यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. याच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण समितीच्या राखीव असलेल्या १० लाखाच्या निधीतून हा खर्च केला जाणार आहे. यासंदर्भात मंगळवारी शिक्षण समितीच्या सभेत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. वर्षभरापूर्वी केडीएमसीच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या १० हजाराच्या आसपास होती. आजच्याघडीला ती ९ हजारापर्यंत आली आहे. तर शाळा या ७४ च्या आसपास होत्या. पंरतु विद्यार्थ्यांअभावी यातील ९ शाळा बंद कराव्या लागल्या. विद्यार्थ्यांची घटत चाललेली पटसंख्या ही शिक्षण विभागासाठी डोकेदुखी ठरली आहे. या घटत्या पटसंख्येमुळे काही शाळा बंद करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावल्याने यावर उपाय म्हणून आता या शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे. सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी दाखल केलेल्या प्रस्तावाला एकमताने मान्यता देण्यात आली. सद्यस्थितीत इयत्ता पहिली आणि इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांमध्ये सेमी इंग्रजीचे धडे गिरवले जाणार आहेत. या वर्गास आवश्यक असलेली पाठयपुस्तक ांच्या खर्चासाठी सभापती आणि शिक्षण समितीसाठी राखीव असलेला निधी वापरला जाणार आहे. याकामी सुमारे तीन लाखाचा खर्च होईल अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. पहिलीच्या वर्गात २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करणे व पुढे क्रमाने पुढील शैक्षणिक वर्ष २०१८-१९ इयत्ता दुसरी, २०१९-२० मध्ये तिसरी, २०२०-२१ मध्ये चौथी याप्रमाणे सेमी इंग्रजी वर्ग सुरू करणे व २०१७-१८ पासून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्रजी सुरू करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. तातडीने याची अंमलबजावणी करा असे आदेश सभापती घोलप यांनी दिले. तमीळ माध्यमाची शाळा आता नववीपर्यंत केडीएमसी क्षेत्रातील मोहने येथील तिपन्नानगर येथे महापालिकेची तमीळ माध्यमाची एकच शाळा आहे. तेथे पहिली ते आठवीचे एकूण १८७ विद्यार्थी आहेत. दरम्यान, या परिसरात मोठया प्रमाणावर तमीळ समाज राहत असून त्यांच्या पाल्यांना माध्यमिक शिक्षण घेण्याची (इयत्ता ८ वी च्या पुढील शिक्षण) सुविधा नसल्याने तेथील शाळेमध्ये नववीचे वर्ग सुरू करण्यात यावेत असा प्रस्तावही सभेत मंजूर करण्यात आला. मराठी माध्यमासह अन्य भाषिक विद्यार्थ्यांसाठीही माध्यमिक शाळांचा विचार व्हावा अशी सूचना शिवसेनेच्या सदस्या वीणा जाधव यांनी मांडली.
घटत्या पटसंख्येला सेमी इंग्रजीचा आधार
By admin | Published: June 14, 2017 2:54 AM