ठाणे : ठाणेकरांवर यंदाच्या आर्थिक वर्षात करवाढ लादण्याचे संकेत ठाणे महापालिकेने दिले आहेत. घरगुती वापराच्या पाणीबिलात ४० ते ५० टक्के तर हॉटेल, बार, बँका, स्वीट मार्ट, लॅब, रसवंतीगृह, बेकरी, ब्युटीपार्लर, शाळा, धार्मिक स्थळे, सरकारी शाळा आदींच्या पाणीकरातही वाढ प्रस्तावित आहे. टँकरच्या दरातही ५०० रुपयांची दरवाढ, रस्ताफोड फीमध्येही एक हजार रुपयांची वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. परंतु, ठाणेकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ लादणार नसल्याचे सत्ताधारी शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि विरोधकांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ही दरवाढ प्रस्तावित केली आहे. महापालिका हद्दीत आजघडीला ४८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा प्रतिदिन होत आहे. विभागाचा महसुली खर्च हा २०२.९२ कोटी आणि उत्पन्न १२६ कोटी आहे. ही तूट ७६.९२ कोटींची आहे. ती भरून काढण्यासाठी विविध स्वरूपात ही करवाढ प्रस्तावित केली आहे. त्यानुसार, घरगुती आणि इमारतधारकांच्या पाणीकरात वाढ प्रस्तावित केली आहे.
प्रशासनाचा प्रस्ताव संमत झाल्यास वाणिज्य स्वरूपातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, कारखाने, बांधकामासाठी व कारखान्यातील कामगारांना लागणारे पाणी, हॉटेल, नर्सिंग होम, स्पोटर््स क्लब, बँका, शैक्षणिक संस्था, प्रिंटिंग प्रेस, महाविद्यालय, वकील, वास्तुविशारद, क्लिनिक, लॅब, इस्त्रीवाला, रसवंतीगृह, आइस्क्रीम पार्लर, ज्युस सेंटर, बेकरी, ब्युटीपार्लर, चायनीज सेंटर, सरकारी कार्यालये, किराणा दुकान, झुणका-भाकर केंद्र, खाजगी शाळा, सरकारी शाळा, व्यायामशाळा आदींच्या पाणीदरात १५ ते ३० रुपयांवर ३० ते ६० रुपयांची वाढ प्रतिहजार लीटरमागे होणार आहे. या वाणिज्यवापराच्या लोकांना मासिक ५०० रुपये ते २५ हजारांपर्यंतचा वाढीव पाणीबिलाचा भार सहन करावा लागणार आहे. याशिवाय तात्पुरत्या स्वरूपात धार्मिक व इतर सर्व कामांसाठी पाणीकनेक्शन घेणाऱ्यांच्या पाण्याचे दरही या प्रस्तावानुसार बदलणार आहेत. त्यानुसार, अर्धा इंचासाठी दर ३०० वरून ५०० आणि एक इंचासाठी ५०० वरून ७०० आकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
पाणी टँकरही महागणारआतापर्यंत एखादा पाण्याच्या टँकर मागविला, तर त्यासाठी एक हजार रुपये मोजावे लागत होते. त्यात आता ५०० रुपयांची वाढ प्रस्तावित केली आहे. तर, व्यावसायिक वापरासाठी १५०० रुपयांऐवजी २००० मोजावे लागणार आहेत. खाजगी टँकर भरण्यासाठी प्रतिफेरी (घरगुती वापरासाठी १० हजार लीटरसाठी) ७०० ऐवजी एक हजार, व्यावसायिक वापरासाठी फक्त पाणी भरणे १२०० ऐवजी १७०० रुपये मोजावे लागणार आहेत.पूरक सेवांचे दर वाढणारपाणीपुरवठा विभागाने आता विविध फीचे दरही निश्चित केले आहेत. त्यानुसार, रस्ताफोड फीमध्ये दोन हजारांवरून तीन हजार वाढ प्रस्तावित, कनेक्शन टॅपिंग फी एक हजारावरून दोन हजार, त्यातही अर्धा इंच आणि एक इंचाचे दर वेगळे असणार. मीटर टेस्टिंग फी अर्धा इंच जुन्यासाठी १००, नव्यासाठी १२० होती. आता जुन्यासाठी २०० आणि नव्यासाठी २५० रुपये अशा पद्धतीने दरवाढ प्रस्तावित केली आहे.दरवाढ करण्याचे संकेत दिले असतील तर पाणीपुरवठादेखील योग्य पद्धतीने करण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे. पाणीपुरवठ्यासंदर्भातील प्रकल्पांना चालना देण्याची गरज आहे, हा प्रस्ताव येईल, त्यावेळी यावर योग्य ते भाष्य करता येईल.- प्रमिला केणी, विरोधी पक्षनेत्या, ठामपादरवाढ करायची की नाही, हा अधिकार महासभेचा आहे. अर्थसंकल्प अद्याप स्थायी समितीला सादर झालेला नाही. त्यानंतर तो महासभेत येईल. दरवाढीचा नेमका काय प्रस्ताव आहे, ते पाहून नंतरच यावर भाष्य करता येईल. परंतु, ठाणेकरांवर वाढीव कराचा बोजा पडणार नाही, याची काळजीआम्ही घेऊ. - नरेश म्हस्के, महापौर