मीरारोड - बॅनर विरुद्ध सातत्याने तक्रारी करून कायदेशीर कारवाईसाठी आग्रह धरणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या नावेच शिवसेनेचा वापर करून बनावट बॅनर लावल्या प्रकरणी आता शिवसेनेने ह्या मागचा मास्टरमाईंड गजाआड करा अशी मागणी केली आहे.
शिवसेना प्रवक्ते शैलेश पांडे, नगरसेविका स्नेहा पांडे यांनी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची भेट घेऊन तक्रार केली आहे . शिवाय पालिका आयुक्त दिलीप ढोले , पोलीस उपायुक्त अमित काळे , सहायक पोलीस आयुक्त व आमदार प्रताप सरनाईक यांना त्याच्या प्रति दिल्या आहेत .
शैलेश यांनी म्हटले की, कृष्णा हे गेल्या अनेक वर्षां पासून बेकायदा बॅनरबाबत सतत तक्रारी करतात. त्यामुळे त्यांनीच बेकायदा बॅनर आणि तोही शिवसेनेचा लावणे न पटणारे आहे . कृष्णा हे शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीत. त्यांच्या नावाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणे आणि त्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे बेकायदा वापरणे एकूणच कृष्णा याना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासह शिवसेनेला बदनाम करण्याचे कट कारस्थान ह्या मागे आहे.
कृष्णा यांच्या तक्रारी वरून उपमहापौर व माजी महापौर यांच्यासह माजी आमदार मेहतांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा प्रकार घडला असून आताचे तक्रारदार हे भाजपचे कार्यकर्ते आहेत . शिवसेना नेत्यांच्या छायाचित्रांचा बेकायदेशीर वापर करून घाणेरडे व विकृत राजकारण करण्याची गुन्हेगारी मानसिकता ह्या मागे असल्याने कट करणाऱ्या सूत्रधारांसह प्रभाग अधिकारी यांना गुन्हा दाखल करण्यास दबाव टाकणारे व संबंधितांचा तपास करावा अशी शिवसेनेची मागणी असल्याचे शैलेश यांनी सांगितले .